In 7 Nagar Panchayats of Gadchiroli district, voters are in favour of Maha Vikas Aghadi.
गडचिरोली जिल्ह्यातल्या ७ नगर पंचायतींमध्ये मतदारांचा महाविकास आघाडीच्या बाजूने कौल.
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातल्या ९ नगरपंचायतींपैकी ७ नगर पंचायतींमध्ये मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचं दिसून येत आहे. मात्र, दक्षिणेकडील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली या नगर पंचायतींमध्ये आदिवासी विद्यार्थी संघानं बाजी मारली आहे. प्रत्येक नगर पंचायतीमध्ये १७ जागांसाठी निवडणूक झाली. यंदा भारतीय जनता पक्षानं स्वतंत्रपणे निवडणूक लढली, तर शिवसेनेनं काही नगरपंचायतींमध्ये काँग्रेसशी, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली होती.
शिवसेनेला केवळ कुरखेडा इथं ५ तर मुलचेराइथं ४ जागा जिंकता आल्या. अहेरी इथं शिवसेनेला दोन, तर सिरोंचा आणि भामरागडमध्ये प्रत्येकी एक जागा मिळाली. धानोरा नगर पंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकून एकहाती सत्ता प्रस्थापित केली. चामोर्शी नगर परिषदेत वेगवेगळं लढहूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी १३ जागा जिंकल्या. तिथं भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावं लागलं.
कुरखेडा इथं भाजपानं ९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविलं तर काँग्रेस-शिवसेना युतीला ८ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. कोरचीमध्ये ८ जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला तर भाजपानं ६ जागांवर विजय मिळविला.
अहेरीत भाजपने सर्वाधिक ६ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादीला ३, शिवसेनेला २ तर आदिवासी विद्यार्थी संघानं ५ जागा जिंकून सत्ता राखली. मुलचेरा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीनं १० जागा जिंकल्या. सिरोंचामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना युती आणि आदिवासी विद्यार्थी संघानं प्रत्येकी ६ जागांवर विजय मिळविला आहे. एटापल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ८ जागा मिळाल्या तर भाजपाला ३ जागांवर विजय मिळाला.