ग्रामविकास मंत्रालयाचा फ्लिपकार्टसोबत सामंजस्य करार.
पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला पाठिंबा देत, भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाला फ्लिपकार्टचे सहकार्य.
स्थानिक उद्योग आणि विशेषत: महिला नेतृत्व करत असलेल्या स्वयं-सहाय्यता गटांना (एस एच जी ) ई-वाणिज्य बाजाराच्या कक्षेत आणून सक्षम करण्यात साहाय्य करण्याच्या दृष्टीने, फ्लिपकार्ट या भारतातील स्वदेशी ई-कॉमर्स कंपनीने महत्वाकांक्षी दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डी ए वाय -एन आर एल एम ) या कार्यक्रमाला सहकार्य करण्यासाठी, भारत सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ही भागीदारी स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठी ग्रामीण समुदायांच्या क्षमतांना बळकटी देण्याच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या उद्दिष्टाशी अनुरूप असून यामुळे पंतप्रधानांच्या “आत्मनिर्भर भारत” च्या संकल्पनेला अधिक चालना मिळेल.
ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री श्री गिरीराज सिंह, ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या उपस्थितीत 02 नोव्हेंबर 2021.रोजी दिल्ली येथे एका समारंभात दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे सहसचिव (ग्रामीण उपजीविका )श्री चरणजीत सिंग आणि फ्लिपकार्टचे मुख्य कॉर्पोरेट व्यवहार अधिकारी, श्री. रजनीश कुमार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
यावेळी श्री गिरीराज सिंह म्हणाले, “स्वयंसहाय्यता गट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न किमान 1 लाखांपर्यंत वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.यादृष्टीने या कार्यक्रमासाठी योगदान देऊ शकतील असे सर्व संभाव्य भागीदार आम्ही निश्चित करत आहोत आणि त्यांच्याशी सहकार्य करत आहोत, आणि या प्रक्रियेत दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आणि फ्लिपकार्ट यांच्यातील सहकार्य सहाय्य्यकारी ठरेल. या सामंजस्य करारामुळे ग्रामीण महिलांना त्यांच्या उत्पादनांची विक्री फ्लिपकार्टच्या 10 कोटींहून अधिक ग्राहकांना करता येईल, असे श्री सिंह यांनी सांगितले.
हा सामंजस्य करार फ्लिपकार्ट समर्थ कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि कारागीर, विणकर आणि हस्त कौशल्य कारागीर या कुशल तरीही सेवा कमी असलेल्या समुदायांना फ्लिपकार्ट बाजाराद्वारे राष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश, तसेच ज्ञान आणि प्रशिक्षणासाठी समर्पित पाठबळ देण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
ग्रामविकास मंत्रालयाचा दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान कार्यक्रम सर्व 28 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमधील 706 जिल्ह्यांतील 6768 तालुक्यांमध्ये पोहोचला असून 7.84 कोटी महिला 71 लाखांहून अधिक स्वयंसहाय्यता गटांशी जोडल्या गेल्या आहेत,हा कार्यक्रम ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी लक्षणीय परिवर्तन घडवणारा उपक्रम म्हणून सिद्ध होत आहे.
दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे सहसचिव (कौशल्य ) श्री चरणजित सिंग म्हणाले की, “दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाची फ्लिपकार्ट समर्थ सोबतची भागीदारी क्षमता-बांधणी आणि ग्रामीण उपजीविकेच्या साधनांमध्ये वाढ करण्यासाठी आणि प्रभावित करण्यासाठी , विशेषतः महिलांसाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करते.हे पाऊल ग्रामीण उद्योगांच्या उभारणीसाठी आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्या प्रगतीच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक स्रोत एकत्रित आणि योग्य त्या दिशेने प्रवाहीत करेल.”
फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कॉर्पोरेट व्यवहार अधिकारी रजनीश कुमार म्हणाले की, , “आम्ही भारतीय बाजारपेठेसंदर्भातील आमच्या ज्ञानाचा उपयोग हा कमी सेवा असलेल्या समुदायांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी करत आहोत, यापैकी बरेच समुदाय ग्रामीण भागात राहतात. त्यांच्या उत्पादनांना हा फ्लिपकार्ट समर्थ उपक्रम देशभरात पसरलेल्या आमच्या व्यासपीठाद्वारे संभाव्य 350 दशलक्षहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवतो.