Start using the face verification attendance system in the ministry on an experimental basis.
चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा मंत्रालयात प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरु करा – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
मुंबई : कोविड आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती प्रणालीचा वापर करण्यावर वारंवार स्थगिती येत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन तंत्रज्ञान असलेल्या आधार प्रमाणित चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
मंत्रालयात फिंगरप्रिंट आधारित बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीऐवजी आधार प्रमाणित चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा वापर करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री श्री.भरणे बोलत होते. बैठकीस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विवेक भिमनवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे अवर सचिव लक्ष्मण सावंत आदिसह अधिकारी उपस्थित होते.
सामान्य प्रशासन राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रिक पद्धतीने उपस्थितीवर स्थगिती आणण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा वापर केल्यास कर्मचाऱ्यांचा वेळही वाचणार असून, प्रायोगिक तत्वावर अशा काही मशीनचा वापर करण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यमंत्री श्री.भरणे यांनी दिले.