छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा 35 वा वर्धापन दिन.
पुणे : धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानने 1986 साली पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारले. 26 ऑक्टोबर 1986 रोजी माजी पंतप्रधान मा.अटलबिहारी वाजपेयी यांचे हस्ते त्या स्मारकाचे अनावरण झाले. 26 ऑक्टोबर 2021 रोजी या घटनेला 35 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या स्मारक उभारणीत ज्यांचा सहभाग होता, त्या स्मारक समिती सदस्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्याचे धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानने आयोजिले आहे. सदरचा कृतज्ञता सन्मान मंगळवार, दि.26 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वा. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यापन केंद्रात (कर्वे रस्ता) होणार आहे. त्या आधी, सकाळी 10 वा. छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमात हजारो शंभू भक्तांनी सहभागी व्हावे असा प्रयत्न प्रतिष्ठानचे वतीने करण्यात येत आहे.
या छत्रपती संभाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण व कृतज्ञता सन्मान समारंभात मा.प्रदीप रावत, माजी खासदार व अध्यक्ष इतिहास संशोधन मंडळ, मा.मुरलीधर मोहोळ – महापौर पुणे, तसेच मा.प्रविण तरडे – प्रसिद्ध सिनेअभिनेते व दिग्दर्शक उपस्थित राहाणार आहेत.
या समारंभात सर्व शिव-शंभू भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर यांनी केले आहे.