छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या 35 वर्षे पूर्णत्वाचा सोहळा संपन्न.
पुणे : पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाकृती स्मारकाला 35 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी खासदार प्रदीपदादा रावत, अभिनेते प्रवीण तरडे व स्मारकासाठी पुढाकार घेणारे माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर उपस्थित होते. सुरुवातीला महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सोहळ्याची सुरुवात झाली. ज्यामध्ये स्मारक उभारणीच्या कार्यात सहभागी कार्यकर्त्यांचा, त्यातील दिवंगतांच्या नातेवाईकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर सुरेशनाना नाशिककर यांच्या कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचाही हृद्य सत्कार करण्यात आला.
धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान आणि स्मारक समितीच्या कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून हे स्मारक साकारले ज्याचे उद्घाटन 26 ऑक्टोबर 1986 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले होते, त्याच्या आठवणी यावेळी सर्वांनी जागवल्या. यावेळी बोलतांना प्रदीप रावत म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांप्रमाणेच प्रेरणादायी आहेत. शिवशाही सर्व समाजाच्या नसानसात भिनली होती व आजही आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर ? ही कल्पना देखील आपण करु शकत नाही. आज मात्र आपण जातींच्या भिंती पुन्हा उभ्या करुन काय साधतो आहोत, असा सवालही यावेळी त्यांनी केला. दुर्दैवाने आपण महापुरुषांना देखील जाती-पातींमध्ये बांधून टाकले आहे. हे बदलण्यासाठी असे सोहळे केले गेले पाहिजेत.
अभिनेते प्रवीण तरडे यावेळी बोलतांना म्हणाले की, कोणतेही कार्य हे मोठया कष्टाचे असते. समाज एक झाला तर कोणतेही काम अश्यक नसते, याचेच संभाजी महाराजांचे स्मारक हे भव्य उदाहरण आहे. आज पुण्याची प्रमुख ओळख म्हणून या स्मारकाकडे पाहिले जाते. यावेळी धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानची नवीन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी संतोष रासकर व कार्याध्यक्षपदी डॉ. राजेंद्र खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
सुरुवातीला कार्यक्रमामागची भूमिका विषद करुन सर्वांचे स्वागत सुरेशनाना नाशिककर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर सातपुते यांनी केले तर संतोष रासकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.