जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश.

पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात असल्याने कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आठवडी बाजार सुरू करण्याचे आणि दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उद्याने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Dy. CM.Ajit-Pawar
File Photo

बैठकीस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.

जिल्ह्याने लसीकरणात चांगली कामगिरी केल्याबद्दल सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, जिल्हा परिषद तसेच महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सिरम इन्स्टिट्यूट यांचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याने १ कोटी १७ लक्ष लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. लशीची पहिली मात्रा अद्यापही न घेणाऱ्या आणि दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरणातील गती अशीच कायम ठेवावी. लसीकरण कमी असलेल्या भागात विशेष शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील संसर्ग अधिक असणाऱ्या भागावर विशेष लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या रक्तदान शिबिर उपक्रमाचा चांगला फायदा झाल्याचेही श्री.पवार म्हणाले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, आठवडे बाजारासाठी परिसरातील गावातून नागरिक येतात. त्यापैकी काहींना माहिती नसल्याने त्यांनी लस न घेतली असल्याची शक्यता असते. त्यांच्या लसीकरणासाठी बाजार परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. अशा शिबिरांच्या आयोजनांची माहिती नागरिकांना देण्यात यावी. कोविड उपचारासाठीच्या देयकांचे लेखा परीक्षण केल्यानंतर कमी केलेल्या देयकाबाबत रुग्णांना माहिती देण्याची व्यवस्था करावी.

बैठकीत श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. भारती विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे ७ ते ११ वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सीन लशीची प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू करण्यात आली आहे. मागील ३ आठवड्यात पुणे महानगरपालिका क्षेत्रात आणि १५ ऑक्टोबर रोजी पुणे ग्रामीणमध्ये ० मृत्यूची नोंद झाली आहे. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० ठिकाणी विकेंड कोविड लसीकरणास सुरूवात करण्यात आली असून ‘मिशन युवा स्वास्थ्य’ मोहिमेअंतर्गत महाविद्यालीयन विद्यार्थ्यांच्या कोविड लसीकरण नियोजनास सुरूवात करण्यात आली आहे. ‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत ८ ते २० ऑक्टोबर दरम्यान ४ लाख २७ हजार लसीकरण करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *