सरकारी ई मार्केटप्लेसने मिळवला प्रतिष्ठेचा सीआयपीएस पुरस्कार
जीईएमने परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांना मागे टाकत जागतिक डिजिटल तंत्रज्ञान वापर पुरस्कार जिंकला.
सीआयपीएस खरेदीतील सर्वोत्कृष्टता पुरस्कार 2021 मध्ये “डिजिटल तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर” श्रेणीमध्ये सरकारी ई मार्केटप्लेसला (GeM) विजेता म्हणून घोषित करण्यात आले. जीईपी, जग्वार लँड रोव्हर, रॉयल डच शेल, वेनडिजिटल आणि शेल यासह जागतिक स्तरावरच्या सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील खरेदी विभागातील काही बड्या आणि सर्वोत्तम कंपन्यांना मागे टाकून जीईएम या श्रेणीमध्ये विजेता ठरला. जीईएमला अन्य दोन अतिरिक्त श्रेणींमध्ये ‘वर्षातला सार्वजनिक खरेदी प्रकल्प’ आणि ‘वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचा आधार तयार करण्यासाठी सर्वोत्तम उपक्रम’ यामध्ये अंतिम फेरीतील कंपनी म्हणून निवड करण्यात आली. काल लंडन येथे आयोजित समारंभात जीईएमच्या वतीने हा पुरस्कार ब्रिटनमधील भारतीय उच्चायोगाचे प्रथम सचिव (आर्थिक )रोहित वाधवाना यांनी स्वीकारला.
सीआयपीएस पुरस्कार हा द चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ प्रोक्योरमेंट अँड सप्लाय (सीआयपीएस), लंडनच्या अखत्यारीतील जागतिक स्तरावरील खरेदी संदर्भातल्या मान्यताप्राप्त पुरस्कारांपैकी एक आहे. सीआयपीएस ही एक ना-नफा तत्वावर चालणारी जागतिक व्यावसायिक संस्था असून 150 देशांतील समुदायासह खरेदी आणि पुरवठा व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.
जीईएम ही कंपनी व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांद्वारे वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाच्या अंतर्गत 100% सरकारी मालकीच्या कलम 8 अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे.