जेष्ठ साहित्यिक ना.धों.महानोर यांचं निधन

Death of senior writer Na.Dho.Mahanor जेष्ठ साहित्यिक ना.धों.महानोर यांचं निधन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar New

जेष्ठ साहित्यिक ना.धों.महानोर यांचं निधन

‘रानकवी’ ना. धों. महानोर यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले – राज्यपाल रमेश बैस

मराठी मातीतला ‘रानकवी’ हरपला – मुख्यमंत्री
रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला. उपमुख्यमंत्री अजित पवारDeath of senior writer Na.Dho.Mahanor
जेष्ठ साहित्यिक ना.धों.महानोर यांचं निधन
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar New

पुणे : निसर्गकवी आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले जेष्ठ साहित्यिक ना.धों.महानोर यांचं आज पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या संध्याकाळी त्यांच्या मूळ गावी पळसखेड इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शेतकरी कवी अशी त्यांची ओळख होती. खास खानदेशी बोलीचा वापर करुन लिहीलेल्या त्यांच्या कविता गेयतेमुळे लोकप्रिय झाल्या. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं. अजिंठा, एक होता विदूषक, अबोली, जैत रे जैत या चित्रपटांसाठी त्यांनी लिहीलेली गीतं अजूनही रसिकांच्या ओठांवर कायम आहेत. अनेक कविसंमेलनांमधून त्यांनी काव्यगायनही केलं होतं. साहित्यिक चळवळीला ग्रामीण भागात प्रोत्साहन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

कथासंग्रह आणि लेखसंग्रहदेखील प्रसिद्ध आहेत. त्यांनी शेतीविषयक लिखाणही केलं होतं. कवी साहित्यिक म्हणून तसंच शेतकरी म्हणूनही त्यांना अनेक पुरस्कार, सन्मान मिळाले होते. पद्मश्री हा नागरी सन्मान आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. काही काळ ते विधान परिषदेचेही सदस्य होते. मातीतली संवेदना शब्दात मांडणारा हा कवी आज माती सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेला.

रानकवी’ ना. धों. महानोर यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले – राज्यपाल रमेश बैस

राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ कवी, गीतकार, साहित्यिक व माजी आमदार ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

ना. धों. महानोर यांनी आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांचे साहित्य व काव्य हे वास्तवदर्शी व हृदयाला भिडणारे होते. त्यांची अनेक गीते लोकांच्या मनात आहेत. त्यांच्या निधनामुळे राज्याने मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारा एक थोर कवी व साहित्यिक गमावला आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

मराठी मातीतला ‘रानकवी’ हरपला – मुख्यमंत्री

मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

‘मराठी माती सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्य अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. शेती, साहित्यिक मंच ते विधानपरिषद असा त्यांचा प्रवास राहिला. या सर्व ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटवली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

तरल काव्यातून निसर्गाचं हुबेहूब वर्णन करण्याची ताकद महानोर यांच्या लेखणीत होती अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला . ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात की,  ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केले. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कविवर्य ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

“ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महानोर यांच्या ‘रानातल्या कवितां’नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं. निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते ‘वनश्री’ पुरस्काराने सन्मानित होते.

कविवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाने पवार कुटुंबियांनी घनिष्ठ मित्र गमावला 

राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधीमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधीत्व केलं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पवार कुटुंबियांनी  घनिष्ठ मित्र गमावला आहे. महानोर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ना. धों. महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कविवर्य ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

ना.धों महानोर यांची विधान परिषदेतली भाषणं काळजाचा ठाव घेणारी होती, असं शरद पवार यांनी प्रतिक्रियेत म्हटलं आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
महाविद्यालयांनी १०० टक्के विद्यार्थी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा
Spread the love

One Comment on “जेष्ठ साहित्यिक ना.धों.महानोर यांचं निधन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *