जैन धर्म ही एक आचरण प्रणाली – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.
सातवा आगमग्रंथ ‘उवासगदसाओ’ चे मराठी भाषांतर ‘उपासकदशा’ आवृत्तीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन.
जैन धर्म ही एक आचरण प्रणाली असून नागरिकांना जीवन जगतांना आदर्श आचरण करण्याची शिकवण देतो, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाच्या प्रमुख प्रा.डॉ.विमल बाफना लिखित सातवा आगमग्रंथ ‘उवासगदसाओ’ चे मराठी भाषांतर ‘उपासकदशा’आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, प्र.कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव प्रफुल्ल पवार, जैन स्टडीजचे अध्यक्ष डॉ.शैलेश गुजर, ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर, अखिल भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, लेखकांनी जैन धर्मातील तत्वे या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी भाषेत समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन भाषेतील साहित्याचे सर्वसामान्य नागरिकांना कळेल अशा स्वरुपात लेखन केल्यास देशाचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती नागरिकांना समजण्यास मदत होईल.
भगवान महावीर यांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, स्वादरसंतोष, इच्छापरिमाण ही तत्वे सांगितली. आजच्या युगात त्याचे अनुकरण करुन जीवन जगणे काळाची गरज आहे. या तत्वांचे अनुसरण करीत जैनधर्म नेहमीच संकटाच्यावेळी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो असेही ते म्हणाले.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.करमळकर म्हणाले, विद्यापीठात एकूण १७ अध्यासने आहेत. अध्यासनाच्यावतीने अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने संशोधनात्मक कामकाज होत आहे.
डॉ.बाफना यांनी ग्रंथाच्या मराठी आवृत्तीविषयी माहिती दिली.