जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी नवे संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) भूविज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन , अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग, जे पेन्शन विभागाचे प्रभारी देखील आहेत, त्यांनी आज स्पष्ट केले आणि पुनरुच्चार केला की जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सेवानिवृत्त आणि निवृत्तीवेतनधारकांसह समाजातील सर्व घटकांचे नेहमीच “जीवन सुलभ” करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचा अनुभव आणि दीर्घकाळ बजावलेली सेवा ही देशाचा ठेवा आहे असे ते म्हणाले.
निवृत्तीवेतन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या/तिच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडणे शक्य नसल्याबद्दल कार्यालय प्रमुख समाधानी असतील तर ही आवश्यकता शिथिल केली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनाचे वितरण करणाऱ्या सर्व एजन्सी बँकांना सूचित करण्यात आले आहे की जर पती/पत्नीनी कौटुंबिक निवृत्तीवेतन जमा करण्यासाठी विद्यमान संयुक्त बँक खात्याचा पर्याय निवडला असेल तर बँकांनी नवीन खाते उघडण्यावर भर देऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की जोडीदारासह संयुक्त बँक खाते असणे इष्ट आहे आणि ते त्यांच्या जोडीदारासह उघडलेले असले पाहिजे ज्यांच्या नावे पीपीओमध्ये कौटुंबिक पेन्शनसाठी अधिकृत मान्यता अस्तित्वात आहे. या खात्यांचे परिचालन निवृत्तीवेतनधारकाच्या इच्छेनुसार ““former or survivor” किंवा “either or survivor” आधारे केले जाईल असे ते म्हणाले.
संयुक्त बँक खाते उघडण्याचा उद्देश कौटुंबिक निवृत्तीवेतन कोणत्याही विलंबाशिवाय सुरू होणे आणि निवृत्तीवेतनधारकाला नवीन पेन्शन बँक खाते उघडण्यासाठी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही हे सुनिश्चित करणे हा आहे. कौटुंबिक पेन्शन सुरू करण्यासाठी विनंती सादर करताना कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकाला कमीतकमी कागदपत्रे द्यावी लागतील याकडे लक्ष दिले आहे.