ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा

Savitribai Phule Pune University ready for G-20 guests..!! जी-२० मधील पाहुण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज..!! हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Knowledge should be used for the upliftment of the country and society

ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा-राज्यपाल

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

Governor Ramesh Bais राज्यपाल रमेश बैस हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News
File Photo

पुणे : स्नातकांना मिळालेली पदवी त्यांचे ज्ञानाप्रति समर्पण आणि वचनबद्धतेचे प्रतिक आहे. त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान आणि कौशल्य त्यांना आपल्या उद्दीष्टापर्यंत पोहोचविण्यात उपयुक्त ठरेल. स्नातकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२२ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ.राजेश गोखले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले, पदवी प्राप्त करणे हे अंतिम उद्दीष्ट नसून शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परीक्षेचे बदलते स्वरुप आणि नवे तंत्रज्ञानाचे युग लक्षात घेऊन त्यादृष्टीने आपली तयारी करावी लागेल. पुणे माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल उद्योगाचे केंद्र आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल यासाठी विद्यापीठाने सातत्याने प्रकल्प राबविले पाहिजेत.

२१ व्या शतकाच्या गरजा लक्षात घेऊन चांगल्या विचारांच्या आधारे परिपूर्ण व्यक्तीमत्व घडविणे हा शिक्षणाचा गाभा आहे. प्रत्येकाने एक किंवा त्यापेक्षा जास्त विषयात सखोल अभ्यास करण्यासाठी सक्षम असावे. चारित्र्य, नैतिकता, घटनात्मक मूल्ये, बौद्धीक जिज्ञासा, वैज्ञानिकता, रचनात्मकता आणि सेवाभावनेच्या आधारे विज्ञान, समाजशास्त्र, कला, भाषा, तंत्रज्ञान यासह अन्य क्षेत्रातही संधी शोधण्याची क्षमता निर्माण करावी लागेल. उच्च शिक्षणाला उत्पादकतेकडे न्यावे लागेल. विद्यार्थ्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करावी लागेल. विद्यापीठ ही अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वासही राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केला.

रोबोटीक्स, नॅनो कॉम्प्युटरसारख्या विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासोबत अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करावा लागेल. अभ्यासक्रमात वेगाने परिवर्तन करीत विद्यार्थांची क्षमता बांधणी करणे गरजचे आहे. आपल्या अभ्यासक्रमाला बदलते औद्योगिक तंत्रज्ञान, रोबोटिक्स, नॅनो कॉम्प्युटर यांच्याशी सुसंगत राहावे लागेल. आधुनिक आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता प्राप्त करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जात आहे. समकालीन गरजांनुसार अभ्यासक्रमात गतिमान बदल करून विद्यापीठाने आपले विद्यार्थी तयार केले पाहिजेत.

भारत जगातील सर्वात तरुण देश असून जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. विद्यापीठांकडे युवकांची मोठी संख्या आहे जे भविष्यात देशाचे नेतृत्व करणार आहेत. म्हणून विद्यापीठाची जबाबदारी अधिक असून हे आव्हान विद्यापीठ पेलत आहे ही चांगली बाब आहे.

उच्च शिक्षणात सामाजिक स्तरावर एक बौद्घीक आणि कुशल राष्ट्र निर्माण करण्याची क्षमता आहे. गुणवत्तापर्ण उच्च शिक्षण म्हणजे केवळ रोजगार निर्माण करण्यापूरते नाही तर समद्ध राष्ट्र बनविण्याचे केंद्र असावे. नव्या शिक्षण धोरणाच्या आधारे भारताला महाशक्ती करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे, असेही राज्यपाल म्हणाले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, स्नातकांच्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणातून मिळालेले श्रेयांक (क्रेडीट) आपल्या क्रेडीट बँकेत जमा व्हावेत आणि नंतरच्या शिक्षणासाठी ते उपयोगी ठरावेत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे स्नातकांनी घेतलेल्या शिक्षणावर न थांबता विद्यापीठाचे नाव उज्वल करण्यासाठी विविध क्षेत्रात प्राविण्य दाखवावे. ज्ञान, कौशल्य विकास, परंपरेचा अभिमान या बाबींवर नवीन शैक्षणिक धोरणात भर देण्यात आला आहे. या तीन पैलूंच्या आधारे आणि शिक्षणातून मिळणाऱ्या संस्काराच्या आधारे प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

दीक्षांत भाषणात डॉ.गोखले म्हणाले, आपल्याला तंत्रज्ञानाच्या आधारे प्रगती साधता येईल. बदलत्या विश्वात समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्नातकांनी आपल्या ज्ञानाचा पूर्ण उपयोग करावा. कोविडच्या निमित्ताने भारताच्या तांत्रिक क्षमता जगासमोर आल्या. लस संशोधन आणि उत्पादनात आपण संपादन केलेले यश जगासमोर आहे. जैवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता हे विकासाचे नवे सूत्र आहे. या क्षेत्रात आपल्या ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग करून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न स्नातकांनी पूर्ण करावे. बुद्धीमत्त्ता, कठोर परिश्रम, बदलाला सामोरे जाण्याची क्षमता जीवनात यशस्वी करेल. परिश्रमाशिवाय यश नाही हे लक्षात घेऊन स्नातकांनी पुढील वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. पुणे नवउद्योजकांचे नवे केंद्र होत असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पूर्वेचे ऑक्स्फर्ड म्हणून ख्याती मिळवली आहे, असेही ते म्हणाले.

कुलगुरू डॉ.गोसावी म्हणाले, पदवीप्रदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. स्नातकांना पदवीमुळे समाजात महत्वाचे स्थान प्राप्त होत असते, तर त्यांच्या कामगिरीमुळे विद्यापीठाचा दर्जा उंचावत असतो. आतापर्यंत स्नातकांनी विद्यापीठाच्या पदवीचा दर्जा उंचावला आहे. या कामगिरीत यापुढेही सातत्य कायम राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. पदवीप्रदान समारंभात १ लाख २१ हजार २८१ स्नातकांना पदवी, पदविका प्रमाणपत्रे, ११ स्नातकांना एम.फील, ४३८ स्नातकांना पीएचडी आणि १०७ सुवर्णपदके प्रदान करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

पदवीप्रदान समारंभात एप्रिल-मे २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. राज्यपाल श्री.बैस, मंत्री श्री.पाटील आणि सचिव श्री. गोखले यांच्या हस्ते विशेष कामगिरीसाठी देण्यात येणारी सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरूवात दीक्षांत मिरवणूकीने झाली. कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापरिषदेचे सदस्य, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

2 Comments on “ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *