Veteran actress Rekha Kamat dies of old age.
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं वृद्धापकाळानं निधन.
मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. त्या ८९ वर्षाच्या होत्या. मुंबईत माहिम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं मूळ नाव कुमुद सुखठणकर. चित्रपटासाठी घेतलेलं रेखा हे नाव त्यांनी नंतर पटकथा लेखक ग. रा. कामत यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर कायमचंच स्वीकारलं.
गुरु पार्वती कुमार आणि सचिनशंकर यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवणाऱ्या रेखा यांनी नृत्यनाट्यातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. नंतर आपल्या सहज अभिनयाने रंगमंच, रुपेरी पडदा आणि छोटा पडदाही त्यांनी गाजवला.
१९५२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘लाखाची गोष्ट’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यांनी ‘कुबेराचे धन’, ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘गृहदेवता’, ‘माझी जमीन’, ‘अगंबाई अरेच्चा’ आदी चित्रपटात केलेल्या भूमिका गाजल्या.
मराठी कुटुंबातली साधीसुधी तरुणी त्यांनी अनेक भूमिकांमधून हळुवारपणे साकारली. ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’ ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, आदी नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या.
विविध जाहिरातींमधूनही आणि दूरचित्रवाहिनी मालिकांमधून त्यांनी साकारलेली ‘आजी’ घरोघरी लोकप्रिय झाली. एका लग्नाची दुसरी गोष्ट, ‘प्रपंच’ आणि ‘सांजसावल्या’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका. जनकवी पी. सावळाराम पुरस्कार तसंच राज्यशासनाचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता.