Veteran singer-actor Pandit Ramdas Kamat passes away.
ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन.
मुंबई: रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचं काल रात्री पावणे दहाच्या सुमाराला विलेपार्ले इथं त्यांच्या निवासस्थानी वार्धक्यानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते.
पंडित रामदास कामत यांनी लहानपणी वडील बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरच प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचंही प्रशिक्षण घेतलं.
‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकाद्वारे त्यांनी आपल्या संगीत रंगभूमीवरच्या कारकिर्दीची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी ‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत मदनाची मंजिरी’, ‘संगीत एकच प्याला’, ‘संगीत मंदारमाला’, ‘संगीत होनाजी बाळा’ अशा अठरा संगीत नाटकांमधून काम केलं. ‘संगीत मत्स्यगंधा’ हे त्यांचं अत्यंत गाजलेलं नाटक. ‘गुंतता ह्रदय हे’, ‘नको विसरू संकेत मीलनाचा’, ‘तम निराशेचा सरला’ या सारखी त्यांची अनेक नाट्यपदं गाजली. त्यांनी नाटय़संगीतासह भावगीतं, चित्रपट गीतंही गायली. त्यांनी गायलेली ‘जन विजन झाले’, ‘अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे’, ‘श्रीरंगा कमला कांता’, ‘पूर्वेच्या देवा तुझे’, ‘देवा तुझा मी सोनार’ अशी कितीतरी गाणी आजही लोकप्रिय आहेत.
रामदास कामत यांना २०१५ साली ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं’ सन्मानित करण्यात आलं. २००९ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.त्यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे.