ज्येष्ठ लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांचं निधन

Senior writer and journalist Shirish Kanekar passed away ज्येष्ठ लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांचं निधन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar New

Senior writer and journalist Shirish Kanekar passed away

ज्येष्ठ लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांचं निधन

शिरीष कणेकर यांच्या निधनामुळे साहित्य विश्वाचे नुकसान – राज्यपाल रमेश बैस
वाचकांना निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठी लेखनात कणेकरी बाज रूजविणारा लेखक गमावला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : ज्येष्ठ लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. आज मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.Senior writer and journalist Shirish Kanekar passed away
ज्येष्ठ लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांचं निधन
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar New

सिनेमा, क्रिकेट, राजकारण अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या टोकदार आणि नर्मविनोदी शैलीने ठसा उमटवला होता. वन मॅन स्टँडअप टॉक शो म्हणजेच संवादात्मक एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातूनही त्यांना लोकप्रियता मिळाली. यादों की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सूर पारंब्या, कणेकरी, लगाव बत्ती, आसपास, मेतकूट, चित्ररुप, फिल्लमबाजी अशी त्यांची अनेक सदरं वाचकांच्या स्मरणात आहेत. याच सदरांमधल्या त्यांच्या लेखांचे संग्रह पुस्तकरुपानेही प्रसिद्ध झाले आहेत. त्याशिवाय क्रिकेट वेध, आणि ते साठ दिवस. डॉलरच्या देशा ही त्यांची प्रवासवर्णनं ही प्रसिद्ध झाली आहेत. कणेकरी, माझी फिल्लमबाजी आणि फटकेबाजी या प्रयोगातून त्यांनी मराठीत वन मॅन स्टँडअप टॉक शो हा प्रकार प्रथम सुरु केला.

शिरीष कणेकर यांच्या निधनामुळे साहित्य विश्वाचे नुकसान – राज्यपाल रमेश बैस

राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ पत्रकार, लेखक, वक्ते आणि भाष्यकार शिरीष कणेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

“उत्तम पत्रकार असलेले शिरीष कणेकर मिश्किल, हरहुन्नरी व विनोदी लेखक तसेच प्रभावी वक्ते होते.  कणेकर यांनी अखेरपर्यंत स्तंभलेखन केले आणि आपल्या खुमासदार शैलीने वाचकांचे तसेच श्रोत्यांचे मनोरंजन केले. क्रिकेट आणि हिंदी चित्रपटसृष्टी या दोन विषयांवर त्यांनी विपुल लिखाण केले. त्यांच्या निधनामुळे साहित्य आणि सांस्कृतिक विश्वाचे नुकसान झाले आहे. शिरीष कणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो”, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

वाचकांना निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली

आपल्या लेखणीने लाखो वाचकांना निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपले वेगळेपण जपत महाराष्ट्राचे सांस्कृतिक क्षितीज उजळून टाकणारा अवलिया आपल्यातून निघून गेला आहे, अशा शोकपूर्ण भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

कणेकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, शिरीष कणेकर बहुआयामी-बहुपेडी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात पत्रकार,चित्रपट व क्रिकेट समीक्षक, ललित लेखक,एकपात्री कलाकार अशा एकाहून अनेक कला-गुणांचा दुर्मीळ असा मिलाफ होता. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलासक्त होते. त्यामुळे त्यांच्याशीही कणेकर यांचे स्नेहबंध होते. कणेकरांच्या हजरजबाबी आणि हरहुन्नरही व्यक्तिमत्वामुळे ते जिथे-जिथे जातील तिथे हास्याची लकेर उमटत असे. चित्रपट आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रातील अनेक घडामोडींचा त्यांचा बारकाईने अभ्यास असे. विसंगती आणि किश्श्यांतून ते हास्याची कारंजी फुलवत राहिले. त्यांनी स्वतःला कुठल्याही क्षेत्राचे बंधन घालून घेतले नाही. त्यामुळे त्यांनी अष्टपैलू खेळाडुसारखी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मैदानात कामगिरी करून ठेवली आहे. त्यांनी फटकेबाजीही केली आणि आणि विकेटही उडवल्या आहेत. अशी कामगिरी कुणी यापुर्वी केली नव्हती, आणि यापुढेही शक्य नाही. स्तंभलेखन, पत्रकारितेच्या अनुषंगाने त्यांनी चौफेर लेखन केले. त्यांच्या पुस्तकांची नावंही मिश्किल आणि दिलखुलास स्वभावाप्रमाणे खट्याळ-अवखळ अशी वैशिष्ट्यपूर्ण राहिली आहेत. या साहित्यनिर्मितीतून, वैशिष्ट्यपूर्ण एकपात्री प्रयोगांच्या सादरीकरणातून त्यांनी विदेशातही लोकप्रियता मिळवली. यातूनही त्यांनी मराठी साहित्याचे वैभव, बहुविविधता जागतिकस्तरावर पोहचवली आहे. त्यांच्यासारखा अवलिया होणे नाही. त्यांच्या जाण्याने मराठी कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अशा या बहुआयामी महाराष्ट्र सुपुत्राला ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक शिरीष कणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मराठी लेखनात कणेकरी बाज रूजविणारा लेखक गमावला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने खुमासदार लेखन करणारा शब्दप्रभू लेखक गमावला आहे. त्यांनी मराठीत कणेकरी बाजाचे लेखन रूजविले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, “शिरीष कणेकर हे चित्रपट, क्रिकेटचे एका अर्थाने माहितीकोश होते. एखादा प्रसंग रंजक करून कसा सांगायचा, यावर त्यांची हुकूमत होती. शब्दांवर त्यांची एवढी पकड होती की कोणताही प्रसंग ते शब्दांतून चित्रमय करू शकत. त्यांच्या लेखनात कायम कणेकरी बाज दिसायचा. त्यांच्या निधनाने समकालावर वैशिष्ट्यपूर्ण भाष्य करणारा भाष्यकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !”

क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली

“कोट्यवधी भारतीयांचं वेड असलेल्या क्रिकेट व सिनेमा क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोष ही शिरीष कणेकर यांची ओळख होती. क्रिकेट, सिनेमासह अनेक क्षेत्रातील रंजक गोष्टींचा खजिना त्यांच्याकडे होता. या रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला त्यांच्याकडे होती.

या कलागुणांच्या जोरावर त्यांनी क्रिकेट, सिनेमावेड्या मराठी माणसांच्या हृदयात स्थान मिळवलं होतं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या निधनाने सिद्धहस्त लेखक, व्यासंगी पत्रकार, मनस्वी कलावंत, दिलखुलास व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांच्या अजरामर साहित्यकृती तसंच कथाकथनाच्या कार्यक्रमांमुळे ते कायम आपल्यासोबत राहतील. शिरीष कणेकर यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी शिरिष कणेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
कुर्नूल येथील भगवान श्री रामाच्या 108 फूट उंच पुतळ्याची पायाभरणी
Spread the love

One Comment on “ज्येष्ठ लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांचं निधन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *