टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील सहभागी खेळाडूंचा सत्कार

टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील सहभागी खेळाडूंचा क्रीडा मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते सत्कार.

पुणे: क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील सहभागी खेळाडूंचा सत्कार  आणि एशियन गेम्स जकार्ता 2018  मध्ये ब्रीज खेळातील पदक प्राप्त खेळाडू व क्रीडा मागर्दशकांचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे म्हाळुंगे-बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड मध्ये आयोजित या कार्यक्रमाला क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री  कु.अदिती तटकरे (दूरदृश्यप्रणालीद्वारे), शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा  व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया,  आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रच्या नियामक परिषद सदस्य, सहसंचालक चंद्रकांत कांबळे उपस्थित होते.

श्री.केदार म्हणाले, येणाऱ्या पिढीतील खेळाडूंचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येत आहे. खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवावे यासाठी महाराष्ट्र शासन खेळाडूंना सहाय्य करण्यासोबतच त्यांच्या भविष्याची काळजी घेईल. खेळाडू आणि मार्गदर्शक यांच्या सहकार्याने क्रीडा क्षेत्रात राज्याचे नाव उंचावण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.बकोरिया यांनी खेळाडूंसाठी राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा आणि अर्थसहाय्यची माहिती दिली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी राज्यातील 7 खेळाडू आणि 3 पॅरा खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात सिंथेटिक ट्रॅक उभारण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

यावेळी क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते शूटिंग प्रशिक्षक सुमा शिरूर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, आर्चरी खेळाडू प्रवीण जाधव, बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी, अॅथलीट अविनाश साबळे, नौकानयनपटू विष्णू सरावनन, गोल्फपटू उदयन माने, पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी जलतरणपटू सुयश जाधव, नेमबाज स्वरुप उन्हाळकर, अॅथलीट भाग्यश्री जाधव या खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर जकार्ता येथे 2018 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये ब्रिज या क्रीडा प्रकारात पदक प्राप्त खेळाडू जग्गी शिवदासानी, अजय खरे, राजू तोलानी, हेमा देवरा, गोपीनाथ मन्ना, राजीव खंडेलवाल, हिमानी खंडेलवाल आणि मार्गदर्शक केशव सामंत यांना 20 लाखाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *