डिजिटल उपकरणांच्या व्यसनांविषयी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी युवकांना केले सावध.
समाजातील अनिष्ट गोष्टींविरोधात, युवकांना जागृत करण्यासाठी सुप्रसिद्ध व्यक्तींनी पुढाकार घ्यावा.
मोबाईल फोन्स सारख्या, डिजिटल उपकरणांचे मुलांना-युवकांना व्यसन लागू नये, यासाठी, त्यांच्यात जागृती करण्याची गरज आहे, असे मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
अरुणाचल प्रदेशात इटानगर इथे, विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्ती- लेखक, शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि गिर्यारोहकाशी त्यांनी आज संवाद साधला. मुलांना आणि तरुणांना, डिजिटल उपकरणांच्या सतत वापरापासून, तसेच इंटरनेट वर अवलंबून राहण्याच्या प्रवृत्तीपासून, सावध करण्याची गरज आहे. यामुळे त्यांच्यातली सृजनशीलता आणि कल्पनाशक्ति संपून जाईल, असं इशारा देत, युवकांना त्याच्या अतिवापरापासून सावध करण्याची गरज आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
समाजातल्या अनेक अनिष्ट गोष्टींबाबत, जसे लिंग भेदभाव आणि अंमली पदार्थांचे सेवनासारख्या सवयीपासून युवकांना परावृत्त करण्यासाठी समाजातील सुप्रसिद्ध, प्रतिष्ठित लोकांनी पुढाकार घ्यावा, असेही ते पुढे म्हणाले. तसेच, हवामान बदलाच्या विपरीत परिणामांची त्यांना जाणीव करुन देत निसर्ग आणि जलाशयांचे संवर्धन करण्याची शिकवण द्यायला हवी, असा सल्ला त्यांनी दिला.
भारतात कबड्डीसारख्या देशी खेळांना प्रोत्साहन द्यायला हवे. युवकांनी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्याची गरज असून, कोविड ने आपल्याला शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व शिकवले आहे, असे त्यांनी सांगितले. जर व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी असेल, तरच ती मानसिकदृष्ट्याही जागृत राहू शकते, असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.