डॉ.दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती.
पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ. दिलीप नामदेवराव मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. 11) डॉ. मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली.
डॉ. मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद येथे सल्लागार – 1 या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत आहेत.
माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ दिनांक 1 जून 2021 रोजी संपल्यामुळे हे कुलगुरूपद रिक्त होते.
डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
डॉ. दिलीप मालखेडे (जन्म 27 ऑगस्ट 1966) यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई व एमई प्राप्त केली. त्यांनी आयआयटी मुंबई येथून पीएच. डी प्राप्त केली असून त्यांना प्रशासन, संशोधन व अध्यापनाचा व्यापक अनुभव आहे.
कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी प्रो. जगमोहन सिंह राजपुत, निवृत्त महानिदेशक, एनसीईआरटी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. आयआयटी (बनारस हिंदू विद्यापीठ) वाराणसी येथील संचालक प्रमोद कुमार जैन व राज्य शासनाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता समितीचे अन्य सदस्य होते.
समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी प्रो. मालखेडे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.