Dr. Vasantrao Deshpande Memorial Music Festival – “Ek Swar Yatra”
डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत सोहळा – “एक स्वर यात्रा”
द.म.क्षे.सां. केंद्र, नागपूरच्या वतीने 28 ते 30 जुलै 2023 दरम्यान “32 वा डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत सोहळा”
-
सोहळ्याचा 31 वर्षांच्या स्वर यात्रेचा इतिहास
-
या बहुप्रतिक्षीत कार्यक्रमात शास्त्रीय गायन, वादन आणि संगीत नाटक सादर केले जाणार
-
यावर्षीही सुप्रसिध्द कलाकार होणार सहभागी
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीने गेली 31 वर्षे सुप्रसिध्द गायक-अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत सोहळ्याचे आयोजन केले जाते. 31 वर्षांमध्ये हा सोहळा आंतरराष्ट्रीय स्तराचा बनवण्याचे प्रयत्न केले गेले, अनेक नवनवीन प्रयोग कार्यक्रम सादरीकरणात केले गेले. नागपूरच्या रसिकांना या सोहळ्याच्या माध्यमातून देशातील अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांचे गाणे, वादन यांचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर देशातील विविध शास्त्रीय नृत्य प्रकारांचीही ओळख झाली. महाराष्ट्राची संगीत नाटक परंपरा लक्षात घेऊन या आयोजनात विविध संगीत नाटकेदेखील सादर करण्यात आली.
सोहळा सुरु करताना अनेक स्थानिक कलाकार, संगीत संस्था यांना या आयोजनात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न केले गेले. डॉ. वसंतराव यांचे सान्निध्य लाभलेले कलाकार, रसिक यांच्यापर्यंत पोहचून त्यांचा सहभाग वाढवण्याचे प्रयत्नदेखील केले गेले. युवा प्रतिभावंत कलाकारांबरोबर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कलाकारांना आमंत्रित करून या सोहळ्याची प्रतिष्ठा वाढवण्याचे प्रयत्न सुरु ठेवले. डॉ. वसंतराव यांच्या प्रति श्रद्धेमुळे अनेक कलाकारांचे सहकार्य या सोहळ्याला लाभले. 31 वर्षांच्या या प्रवासात नागपूरचे कलाप्रेमी, श्रोते, स्थानिक प्रेक्षक तसेच प्रसारमाध्यमांचे देखील मोठे सहकार्य आणि योगदान लाभले आहे.
या संपूर्ण ‘स्वर यात्रा’ मध्ये नागपूरचे अनेक कलाकार, गुरू, श्रोते, प्रसार माध्यमे , समीक्षक यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. केंद्राच्या वतीने करण्यात आलेल्या या प्रयत्नांची सर्वांनी प्रशंसा केली तसेच कार्यक्रमासाठी सूचना केल्या आणि मार्गदर्शनदेखील केले. म्हणूनच हा सोहळा 31 वर्षांचा प्रवास करण्यात यशस्वी झाला.
आपला इतक्या वर्षांचा इतिहास आणि पारंपरिक गौरव यांचे जतन करत हा आंतरराष्ट्रीय संगीत सोहळा यावर्षी 32 व्य वर्षात पदार्पण करत आहे. सोहळ्याचे आयोजन दिनांक 28 जुलै ते 30 जुलै 2023 दरम्यान दररोज संध्याकाळी 6.30 वाजता डॉ. वसंतराव देशपांडे स्मृति सभागृह, सिविल लाइन्स, नागपूर इथे केले जाणार आहे. या सोहळ्यात शास्त्रीय गायन, वादन आणि संगीत नाटकांचे सुमधुर आणि सदाबहार सादरीकरण केले जाईल. दरवर्षीप्रमाणे या सोहळ्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिध्द कलाकार आपली कला सादर करतील. यावर्षी महोत्सवात सहभागी होणारे कलाकार आणि कार्यक्रमाचा तपशील लवकरच प्रसिध्द केला जाईल. या सोहळ्याला रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहून तो यशस्वी करतील असा विश्वास केंद्राचे प्रभारी संचालक प्रा. सुरेश शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com