After the riots, the situation in Kolhapur City is under control
दंगलीनंतर कोल्हापूर शहरातली परिस्थिती नियंत्रणात
इंटरनेट बंद करण्याचे आदेश
नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात
एसआरपीएफची अतिरिक्त तुकडी
कोल्हापूर : हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेली कोल्हापूर बंदची हाक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनाने अचानक उग्र रूप धारण केलं आणि पुरोगामी विचारांच्या कोल्हापुरात एकच राडा झाला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तब्बल तीन-साडेतीन तास सुरू असलेल्या प्रकारानंतर कोल्हापूर पोलीसांनी अखेर लाठीचार्ज करत आटोक्यात आणला असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.
कोल्हापुरातल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती व्हायरल होऊ नये, यासाठी इंटरनेट बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.
कोल्हापूर शहरातली संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी निश्चिंत रहावं. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं आहे.
आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन कोल्हापूर शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेची पाहणी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली. प्रशासनानं दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी तंतोतंत पालन करावं, या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नाही, असं रेखावार यांनी सांगितलं.
नागरिकांनी सोशल मिडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी केलं आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन सकाळपासूनच संपूर्ण शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात होते.
वातावरण अचानक बिघडत असल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना सांगण्याचे आवाहन केले, मात्र आक्रमक झालेल्या तरुणांनी दगडफेक करत तोडफोड करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनीही लाठीचार्ज केला तर काही ठिकाणी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते तर संपूर्ण स्थितीवर पोलिसांची करडी नजर असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलीसांना यश मिळत आहे. तसेच संबंधितांवर करवाई करण्यात येणार असून नुकसानीचे पंचनामे करण्यास लवकरच सुरूवात करणार असल्याचे सांगितले. तसेच सोशल मीडियावरील कोणतेही चुकीचे मेसेज आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला असून एसआरपीएफची अतिरिक्त तुकडी मागवली आहे. सर्व महत्त्वाच्या ठिकाणांसह संपूर्ण शहरातून जमावाला पांगवलं आहे. हुल्लडबाजी आणि दगडफेक केलेल्यांना शोधून ताब्यात घेण्याची आणि पुढच्या कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. झालेल्या नुकसानाचे पंचनामे आणि पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com