देशसेवेच्या गौरवास्पद 32 वर्षांनंतर आयएनएस खुकरी सेवेतून निवृत्त.
मुंबई : स्वदेशी बनावटीची पहिली क्षेपणास्त्र युद्धनौका आय एन एस खुकरी आज देशसेवेच्या गौरवास्पद 32 वर्षांनंतर 23 डिसेंबर 2021 ला सेवेतून निवृत्त झाली. विशाखापट्टणम इथे झालेल्या या कार्यक्रमात खुकरीवरचा राष्ट्रीय ध्वज, नौदल एनसाईन आणि डीकमिशनिंग पॅनेट सूर्यास्ताला खाली झुकवून निरोप देण्यात आला. पूर्व नौदल कमांडचे कमांडिंग इन चीफ फ्लॅग ऑफिसर व्हाईस एडमिरल बिश्वजीत दासगुप्ता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जहाजाचे विद्यमान आणि निवृत्त माजी कमांडिंग अधिकारी यावेळी उपस्थित होते.
23 ऑगस्ट 1989 ला माझगाव गोदीने याची बांधणी केली होती. पश्चिम आणि पूर्व ताफ्याचा ती भाग होती. तत्कालीन संरक्षण मंत्री, कृष्णचंद्र पंत आणि दिवंगत कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांच्या पत्नी सुधा मुल्ला यांनी मुंबईत या नौकेचा सेवेत समावेश केला. कमांडर संजीव भसीन (आता व्हाईस ऍडमिरल निवृत्त) याचे पहिले कमांडिंग अधिकारी होते.
आपल्या सेवा काळात आयएनएस खुकरीवर 28 कमांडिंग अधिकारी होते आणि तिने 6,44,897 सागरी मैलांचा प्रवास केला.
भारतीय लष्कराच्या गोरखा ब्रिगेडशी ही नौका संलग्न होती. गोरखा ब्रिगेडचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल अनंत नारायणन या कार्यक्रमाला उपस्थित होते.