देशाच्या राजकारणातील अष्टावधानी नेतृत्व
शरद पवार.
शरद पवारसाहेब महाराष्ट्राच्या नव्हे, तर देशाच्या राजकारणातील अष्टावधानी नेतृत्व आहे. शांत, संयमी, धोरणी आणि अभ्यासू कणखर द्रष्टे नेतृत्व म्हणून तमाम भारतीयांकडून पवार साहेबांकडे पाहिले जात आहे. शरदरावांच्या रूपाने देशाच्या राजकारमातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक गुणात्मक परिवर्तन करणारे नेतृत्व महाराष्ट्राला मिळाले हे आमचे भाग्य आहे. समाजाच्या मूल्यांची जोपासना करीत देशाच्या गौरवशाली परंपरेचा झेंडा फटकावत ठेवण्याचे काम साहेबांकडून केले जात आहे.
दरवर्षी दिवाळी पाडव्याला गोविंद बागेत चाहत्यांची मांदियाळी असते. लहानथोरांपासून विरोधकही त्यांना भेटण्यासाठी येतात. दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देतात. गोविंद बागेतील दिवाळी सर्वांच्याच स्मरणात राहील, अशी आहे. भल्या सकाळी साहेब, दादा आणि ताई सर्वांना भेटून शुभेच्छा देतात. पवारसाहेबांच्या स्मरणशक्तीचे सर्व स्तरातून कौतक होत आहे. एकदा भेटलेल्या व्यक्तीला ते नावानिशी ओळखतात. मी १९८२ साली मुंबईमध्ये नोकरी करीत असताना साहेबांना मंत्रालयामध्ये भेटायला गेलो होते. तेथे गेल्यावर मी अशोक तुकाराम बालगुडे (घाटकोपर, मुंबई) अशी चिठ्ठी लिहून पाठविली. मला काही वेळातच बोलावले आणि मी दरवाजा वाजवून आतमध्ये गेलो. एवढ्या मोठ्या व्यक्तीने हसतमुख माझे स्वागत केले आणि चहा दिला. त्यानंतर त्यांनी मला बालगुडेपट्ट्यातील का म्हणून विचारले आणि मी त्यावेळी अचंबित झालो. तेव्हापासून मी त्यांच्या गळ्यातील ताईतच बनलो आहे. अभ्यासू आणि कर्तबगार नेत्याच्या वाढदिवसानिमित्त मनोमन भरते आल्याशिवाय राहत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पवार साहेबांचे जगभर प्रसिद्ध आहे. चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सलग नऊ वर्षे केंद्रीय कृषिमंत्री म्हणून दिल्लीत कणखर नेतृत्व केले. त्याचवेळी देशातील शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत कर्जमाफी दिली, हा मोठा ऐतिहासिक निर्णय ठरला आहे.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवतंरावजी चव्हाण यांचे मानसपुत्र पवार साहेबांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठासह चार विद्यापीठांनी साहेबांना डी.लीट. पदवी देऊन सन्मानित केले आहे. सत्तेच्या राजकारणात अर्थकारण, राजकारण आणि समाजकारणाला कोणती दिशा द्यायची, याबद्दल त्यांच्यात स्पष्टता आहे. विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्हे देशात त्यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र एक प्रगत राज्य म्हणून लौकिकाप्रत आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सामाजिक न्यायाच्या पातळीवरील त्यांच्या भूमिकाही प्रागतिक असून, उपेक्षितांच्या हक्कांबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. भारतीय संसदेच्या राजकारणातील एक अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटू स्वकर्तत्वावर त्यांनी विविध क्षेत्रात विविध विषयावर केलेल्या विचारपूर्वक अशा मौलिक संवादातून शब्दांची शिंपन आमच्या मनाला हिरवेपणा देऊन जाते. देशाच्या सर्वोच्च लोकशाही मंदिरामध्ये आपल्या अमोघ वक्तृत्व, अभ्यासाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तळमळीने सह्याद्रीचे प्रतिनिधी म्हणून नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या अनमोल कार्याची दखल घेत संसदेने राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू म्हणून दिलेला सन्मान साहेबांच्या अनमोल कार्याची साक्ष पटवितो. साहेबांचे औद्योगिक, शिक्षण, कृषी क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. राज्यामध्ये पहिले महिलाविषयक धोरण २२ जून १९९४ साली जाहीर केले. आज स्त्री हक्काची सनद म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. पवारसाहेबांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी कोटी शुभेच्छा…..
–