More than 95% of eligible beneficiaries in the country have received at least one dose of the Corona vaccine.
देशातल्या ९५ टक्क्यांहून अधिक पात्र लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची किमान एक मात्रा.
नवी दिल्ली: देशातल्या ९५ टक्क्याहून अधिक पात्र नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीची किमान एक मात्रा मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात भारतानं नव्या वर्षात केलेला ऐतिहासिक विक्रम असल्याचं मांडविय यांनी म्हटलं आहे.
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत देशानं आज १६४ कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. देशभरात आत्तापर्यंत पात्र लाभार्थ्यांना १६४ कोटी ३४ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ६९ कोटी ६९ लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लसीच्या दोन, तर ९८ लाख ५८ हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लसीची वर्धकमात्रा मिळाली आहे.
देशात आज सकाळपासून ५२ लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. यात ३० लाखापेक्षा अधिक जणांना लसीची दुसरी, ६ लाखापेक्षा जास्त जणांना लसीची वर्धक, तर १५ ते १७ या वयोगटातल्या ५ लाख ६७ हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा दिली गेली.
राज्यातही आज सकाळपासून ३ लाख २३ हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत पात्र लाभार्थ्यांना १४ कोटी ७२ लाखापेक्षा जास्त लसमात्रा दिल्या गेल्या. यापैकी ६ कोटी ५ लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लसीच्या दोन, ७ लाख ७९ हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांना वर्धक, तर १५ ते १७ या वयोगटातल्या ३० लाख ६२हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे.
देशात मोठ्या प्रमाणात कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण झाल्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करायला लागण्याचं प्रमाण, तसंच कोरोना मृत्यूचं प्रमाणं अत्यंत कमी राहिलं असं केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे २०२१मध्ये दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूचा आलेख चढा असतांना देशात केवळ ३ टक्के पात्र नागरिकांचं पूर्ण लसीकरण झालं होतं. मात्र जानेवारी २०२२ च्या २१ तारखेपर्यंत देशभरातल्या ७५ टक्के नागरिकांचं पूर्ण लसीकरण झालं. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी त्याची तीव्रता कमी राहू शकली असं ते म्हणाले.