देशातील स्टार्टअप्स जगतामध्ये एक नवीन उर्जा आहे. 2021 च्या केवळ पहिल्या 6 महिन्यांत भारताने आणखी 15 युनिकॉर्न स्थापन केल्या आहेत” – पियुष गोयल.
“भारतीय स्टार्टअप्स व्यावसायिक यशोगाथांपुरते मर्यादित नाहीत तर देशाच्या परिवर्तनात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे “- गोयल.
पुढील पाच वर्षांत देशातील 13 क्षेत्रात 26 अब्ज डॉलर्स किंमतीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना कार्यान्वित होतील – पियुष गोयल.
“देशातील स्टार्टअप्स जगतामध्ये एक नवीन उर्जा आहे. 2021 च्या केवळ पहिल्या 6 महिन्यांत भारताने आणखी 15 युनिकॉर्न स्थापन केल्या आहेत ” असे पियुष गोयल यांनी म्हटले आहे. भारताच्या उदयोन्मुख उद्योग आणि व्यापार व्यवस्थेबाबत सीआयआय-होरासिस इंडिया बैठक 2021 च्या पूर्ण सत्रात ते बोलत होते. .
ते म्हणाले की भारतीय स्टार्टअप्स व्यावसायिक यशोगाथांपुरते मर्यादित नाहीत तर देशाच्या परिवर्तनात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. गोयल यांनी सर्वांना “स्टार्टअप इंडिया” “राष्ट्रीय सहभाग आणि राष्ट्रीय चेतना” चे प्रतीक बनवण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले की कोविड -19 संकट असूनही भारतात आर्थिक पुनरुज्जीवन होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. निर्यात वाढत आहे आणि एफडीआय अर्थात थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ सर्वाधिक आहे. भारतीय उद्योगक्षेत्र खरोखरच प्रगतीपथावर आहे.
कृषी उत्पादने निर्यातदारांच्या जागतिक यादीमध्ये (डब्ल्यूटीओच्या अहवालानुसार) अव्वल दहामध्ये भारताने स्थान मिळवले आहे असे गोयल म्हणाले .
पूर्ण सत्राला संबोधित करताना ते म्हणाले की आज भारत हा उद्योग, गुंतवणूक आणि नावीन्यपूर्ण संशोधनासाठी पसंतीचे ठिकाण आहे. गेल्या 7 वर्षात संरचनात्मक बदल घडवून आणण्याचे सातत्याने प्रयत्न केल्याचा हा परिणाम आहे. मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन, आधुनिकीकरण, सरलीकरण आणि सुविधा यांचा प्रमुख बदलांमध्ये समावेश आहे.
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रत्येक क्षेत्रात पीएलआय अर्थात उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना राबवून देशातील उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने 5 वर्षात 13 क्षेत्रांमध्ये 26 अब्ज डॉलर्सच्या मूल्याच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना जाहीर केल्या आहेत. कोविड नंतरच्या काळात पीएलआय योजना या भारताला आघाडीच्या उद्योग महासत्तेत परिवर्तित करतील.
व्यापार सुलभ उपाययोजना करून वाटाघाटीमध्ये परस्पर देवाणघेवाण आणि निष्पक्षता हा आमचा मंत्र आहे, आज भारत नॉन टॅरिफ बॅरिअर्सकडून नो ट्रेड बॅरियर्सकडे वाटचाल करत असून भारतीय व्यापार “फक्त वस्तू” वरून रोजगार निर्मितीबरोबरच “वस्तू, सेवा आणि गुंतवणूक” कडे वळत आहे असे गोयल म्हणाले.
भारताच्या आर्थिक प्रगतीतील सर्व हितधारकांनी आणि सत्रात सहभागी झालेल्यांनी अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या वाढीच्या संधी शोधल्या पाहिजेत. लसी, औषध उत्पादने, आयसीटीशी संबंधित वस्तू व सेवा इत्यादी त्वरित व अल्प-मुदतीसाठी संधींची संभाव्य क्षेत्रे आहेत,असे गोयल म्हणाले .
दीर्घ कालावधीत डिजिटायझेशन, स्वच्छ ऊर्जा आणि जीव्हीसी यासारखी क्षेत्रे ही वाढीची क्षेत्र आहेत. कृषी , वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, सागरी उत्पादने, नौवहन सेवा सारख्या क्षेत्रात देखील उत्तम संधी आहेत असे गोयल यांनी शेवटी सांगितले .