देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणातच – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.
पुणे येथे ‘पढेगा भारत’ जिओटीव्ही एज्युकेशन चॅनेलचे उद्घाटन.
पुणे : देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणात आहे. शिक्षण क्षेत्रात लावल्या जात असलेल्या नित्यनूतन शोधातूनच आपल्याला प्रगती साधायची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
पिंपरी येथील आचार्य अत्रे रंग मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते जिओटीव्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘पढेगा भारत’ चॅनेलचे उद्घाटन झाले.
कल्पना करायची असेल तर उच्च दर्जाची करावी, असे सांगून राज्यपाल म्हणाले, साहसाचा संकल्प केला तर आपल्या हातून उत्कृष्ट दर्जाचे काम घडू शकते. माजी प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी साहसवादाचे कृतिशील उदाहरण घालून दिले. आता पाश्चात्य देशांपेक्षा आपल्या संस्कृतीकडे जग आपल्याकडे आशेने पाहत आहे.
‘पढेगा भारत’ हे चॅनेल शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त करून सांस्कृतिक संवर्धनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबरच अध्यात्मिक इंटेलिजन्सलाही महत्त्व द्यावे लागेल, असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.
डॉ.कराड म्हणाले, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून त्यात जो अधिक स्पर्धात्मक राहील तोच पुढे जाईल.
डॉ.माशेलकर म्हणाले, अल्प खर्चात उच्च दर्जाचे शिक्षण हे उद्दिष्ट असले पाहिजे. शिक्षणाचा विस्तार, वेग, शाश्वतता, गुणवत्ता याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ‘राईट टू एज्युकेशन’ बरोबरच ‘राईट एज्युकेशन’ आणि ‘राईट वे ऑफ एज्युकेशन’ हे आताच्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे.
श्री.इदाते म्हणाले, गौतम बुद्धांची प्रज्ञा, शील आणि करुणा ही तत्वे आत्मसंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. अमर साबळे यांनी सुरू केलेले ‘पढेगा भारत’अभियान शिक्षणाला व्यापक स्वरूप देईल असेही ते म्हणाले.
डॉ.नितीन करमळकर म्हणाले, कोविड काळात शिक्षण ठप्प झाले आणि आपण ऑनलाइन शिक्षणाकडे वळून त्याचे स्वरूप व्यापक केले. शालेय शिक्षण ते उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. केवळ डिजिटल नव्हे तर दर्जेदार शिक्षण यातून मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी वेणू साबळे यांनी स्वागत करून पढेगा भारतच्या कामाचा आढावा घेण्यासह आज उद्घाटन झालेल्या नवीन चॅनेलची माहिती दिली.