Citizens who take both doses are less likely to be hospitalized.
दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं प्रमाण कमी.
मुंबई: कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं आणि अतिदक्षता विभागात दाखल करावं लागण्याचं प्रमाण कमी असल्याचं मुंबईत आढळून आलं आहे.
मुंबईतल्या नागरिकांच्या जनुकीय सूत्र निर्धारणात ८९ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारचे विषाणू आढळून आले आहेत. तर ८ टक्के रुग्णांमध्ये डेल्टाचे उपप्रकार आणि ३ टक्के रुग्णांमध्ये डेल्टा प्रकारचा विषाणू आढळून आले आहेत, असं मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट झालं आहे.
जनुकीय सुत्र निर्धारणाच्या ८ व्या फेरीत मुंबईतल्या २८० नमुन्यांचे जनुकीय निर्धारण करण्यात आले होते. त्यातल्या २४८ नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन प्रकारचा विषाणू आढळून आला आहे. मुंबईत डिसेंबरमधल्या जनुकीय सूत्र निर्धारणात पहिल्यांदा ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळले होते.
२८० पैकी ९९ जणांनी कोरोनाप्रतिबंधक लशीची एकही मात्रा घेतली नव्हती. त्यातल्या ७६ जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं, १२ जणांना ऑक्सिजनची गरज भासली आणि ५ जणांना अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं. ७ जणांनी कोरोनाप्रतिबंधक लशीची एकच मात्रा घेतली होती. त्यातल्या ६ जणांना जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि २ जणांना अतिदक्षता विभागाची गरज लागली.
लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १७४ रुग्णांपैकी ८९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी २ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली, तर १५ रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. कोविड विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणुच्या २ किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखू येतो. ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते.