Through the new educational policy, the importance of Indian knowledge and culture will be conveyed to the students
नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून भारतीय ज्ञान आणि संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जाणार-कुलगुरू डॉ. कारभारी काळे
शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेमुळेच ग्रामीण भागाची खरी ओळख होत असते -चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे
पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशनाचे आयोजन
पुणे: विचारांमधल्या आक्रमकतेला संयमितपणे आचरणात आणण्याचा बोध राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दिला जातो. त्यासाठी योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांमार्फत होत असलेले कार्य हे देशातील युवा पिढीला दिशा देणारे ठरत असल्याचे मत चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी शनिवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन-दिवसीय अधिवेशनाचा समारोप शनिवारी तरडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. त्यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून स्वतःला आलेल्या अनुभवांविषयी बोलताना तरडे यांनी हे मत मांडले. योजनेतील उपक्रमांचे कौतुक करतानाच त्यांनी कार्यक्रम अधिकारी व प्राध्यापक-शिक्षकांच्या भूमिकेविषयीही गौरवोद्गार काढले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्थीकेन, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, सागर वैद्य, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
तरडे म्हणाले, “शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेमुळेच ग्रामीण भागाची खरी ओळख होत असते. त्यामुळे कँपसला कम्युनिटीशी थेट जोडण्याचे कामंच ही योजना करत आली आहे. त्यासाठी योजनेचे अधिकारी-प्राध्यापक हे त्यांच्या कार्यातून एक वैचारिक अधिष्ठानंच विद्यार्थ्यांसमोर उभे करत असतात.” या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यभरातील कार्यक्रम अधिकाऱ्यांना दिशा देण्याचे काम झाल्याविषयी मांडे यांनी समाधान व्यक्त करतानाच, यापुढील काळातील सर्व उपक्रमांसाठी राज्य सरकार पाठबळ देणार असल्याची ग्वाहीही दिली.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून भारतीय ज्ञान आणि संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनाही त्यासाठी पूरक काम करू शकेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. काळे यांनी या निमित्ताने व्यक्त केला. जी-२० परिषदेसारख्या उपक्रमांमुळे मिळणारे व्यासपीठ प्रभावीपणे वापरून हे भारतीय ज्ञान आणि संस्कृतीची ओळख जगासमोर मांडण्यासाठी या पुढील काळात प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. राज्यभरातून आलेल्या कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या प्रातिनिधीक प्रतिक्रियांमधून हे अधिवेशन यशस्वी झाल्याच्या भावना या समारोपप्रसंगी उमटल्या. डॉ. चाकणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भोसले यांनी आभार मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com