‘नव्वद दिवस कार्यक्रमासाठी मिशन मोडवर काम करा-प्रधान सचिव संजीव जयस्वाल
पुणे – जलजीवन मिशन अंतर्गत ‘९० दिवस कार्यक्रम’ यशस्वी करण्यासाठी मिशन मोडवर काम करावे, तसेच रेट्रोफिटिंग व नवीन योजनांच्या अंमलबाजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी दिले.
पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापुर व कोल्हापुर या पाच जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ व ‘स्वच्छ भारत मिशन’ योजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त सी.डी. जोशी , पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन, महाराष्ट्ट जीवन प्राधिकरण पुणेचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे, कार्यकारी अभियंता अमित आडे आदी उपस्थित होते.
बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘९० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत करावयाच्या कामांबाबत श्री.जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले आणि जिल्हानिहाय आढावा घेतला. या कार्यक्रमाअंतर्गत रेट्रोफिटिंग व नवीन योजना अंमलबजावणीबाबत कालबद्ध उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व मागण्या याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी, तसेच पाचही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) , कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग , वरिष्ठ भुवैज्ञानिक , भुजल सर्वेक्षण व विकास यांच्याकडून जिल्हानिहाय जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनमधील योजनांचा सविस्तर आढावादेखील यावेळी घेण्यात आला.