नाताळचा सण समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो – उपमुख्यमंत्री अजित पवार.
उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला नाताळच्या शुभेच्छा.
मुंबई : मानव कल्याणासह जगाला प्रेमाचा संदेश देणाऱ्या भगवान येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंदासह उत्तम आरोग्य घेऊन येवो, समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो, अशा शब्दात नाताळच्या सणानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार शुभेच्छा संदेशात म्हणतात की, जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराची शिकवण देणाऱ्या भगवान येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा नाताळचा सण सर्वत्र आनंद, चैतन्य, उत्साहाचं वातावरण घेऊन येतो. छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा नाताळचा सण यंदाही उत्साहात साजरा करायचा आहे. ‘मात्र ‘ओमायक्रॉन’चं नव संकट आपल्या राज्यासह संपूर्ण जगासमोर आहे. त्यामुळे यंदा नाताळचा सण उत्साहात मात्र अत्यंत साधेपणाने, घरातच साजरा करा. नाताळचा सण साजरा करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, स्वत:चं, कुटुंबाचं, समाजाचं संरक्षण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, ती पार पाडूया, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करूया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.