नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने मुंबईतील मोठ्या ड्रग कार्टेलचा पर्दाफाश केला 18 कोटी रुपयांचे सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB), मुंबईने एका मोठ्या ड्रग्ज कार्टेलचा पर्दाफाश केला असून 18 कोटी रुपयांचे सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त केले आहेत.
एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक, समीर वानखेडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, एजन्सीने गेल्या दोन दिवसांत सुमारे आठ कारवाया सुरू केल्या, ज्यामुळे अॅम्फेटामाइन, अफू आणि झोल्पीडेमच्या गोळ्या यांसारख्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले.
श्री. वानखेडे म्हणाले की, पेडलर्स आणि पुरवठादार स्टेथोस्कोप, मायक्रोवेव्ह ओव्हन, सायकलिंग हेल्मेट, कॉम्प्युटरचा हार्ड ड्राईव्ह आणि खाण्यापिण्याच्या वस्तू आणि किराणा सामानात लपवून सायकोट्रॉपिक पदार्थांची तस्करी करण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग वापरतात.
ते म्हणाले की, अमली पदार्थांची खेप यूएसए, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूएई, स्वित्झर्लंड आणि मालदीवमध्ये पोहोचवली जाणार होती.
एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की त्यांनी आयव्हरी कोस्टच्या एका नागरिकाला अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात टाकलेल्या छाप्यात NCB ने एकूण 2.296 किलो अॅम्फेटामाइन, 3.906 किलो अफू आणि 2.525 किलो झोल्पीडेमच्या गोळ्या जप्त केल्या आहेत.