नियतकालिकांचे टपाल परवाने रद्द करण्याच्या कारवाईने प्रकाशकांत खळबळ.
पुणे :- नियतकालिकांच्या दिवाळी अंकांची अंतिम धावपळ सुरु असतांनाच वृत्तपत्र नोंदणी निबंधक (नवी दिल्ली) यांच्याकडून अद्ययावत प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरुन अनेक नियतकालिकांना सवलतीच्या दराने पोस्टींग करण्यास टपाल खात्याने अटकाव करत नियतकालिकांचा सवलतीचा परवाना ताबडतोब रद्द करीत असल्याच्या नोटीसा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नियतकालिकांना वृत्तपत्रांचे निबंधक म्हणजेच रजिस्ट्रार फॉर न्यूजपेपर्स ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांचेकडे नोंदणी केल्यानंतरत सवलतीच्या दराने टपाल खाते परवाना देेते, मात्र त्या नोंदणी प्रमाणपत्रात झालेले बदल अद्ययावत झाले नसल्याचे कारण देऊन टपाल खात्याने थेट परवाना रद्द करीत असल्याच्या कारवाईच्या नोटीसा दिल्या आहेत. नियतकालिकांची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन हा अन्याय दूर व्हावा अशी मागणी मराठी नियतकालिक परिषदेतर्फे अध्यक्ष डॉ.सागर देशपांडे व सरचिटणीस भालचंद्र कुलकर्णी यांनी पुण्याच्या पोस्ट मास्तर जनरल जी.मधुमिता दास यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पुणे शहरातील अनेक नियतकालिकांच्या लक्षावधी प्रती वितरीत करण्यामध्ये या नोटीसांमुळे मोठा अडथळा निर्माण झाला असून आधीच संकटात असलेली नियतकालिके आणखीच अडचणीत सापडली आहेत.
परिषदचे अध्यक्ष डॉ.सागर देशपांडे व सरचिटणीस भालचंद्र कुलकर्णी यांनी अशा प्रकारे महाराष्ट्रात तरी अन्यत्र कुठेही अशी कारवाई होत नसतांना फक्त पुण्यातच अशी कारवाई का केली जात आहे, असा सवालही निवेदन देतांना विचारला. वृत्तपत्रांचे निबंधक यांच्या कार्यालयात गेली 2 वर्षे अनेक प्रकरणे पडून असून फारच थंड काम सुरु आहे, कोणतेही उत्तर मिळत नाही, त्यामुळेच अनेक नियतकालिकांना अद्ययावत प्रमाणपत्रे मिळू शकलेली नाहीत, ही वस्तूस्थिती असल्याचे देखील मधुमिता दास यांच्या निदर्शनास यावेळी आणून दिले आहे. टपाल खाते व वृत्तपत्र नोंदणी हे दोन्ही विभाग केंद्र सरकारचे असल्याने त्यामध्ये समन्वय नसल्यानेच असे प्रसंग वारंवार घडत असल्याचे देखील दिसून येते. ज्याचा निष्कारण त्रास प्रकाशकांना सोसावा लागत आहे.
यावेळी बोलतांना मधुमिता दास म्हणाल्या की, टपाल खात्याच्या दिल्ली कार्यालयाने असे आदेश दिले आहेत, मात्र याबाबत अधिक माहिती घेवून व स्पष्टता आणून दिलासा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करु असे आश्वासन दिले. याबाबत गेले महिनाभर टपाल खात्याचे पश्चिम विभागाचे वरिष्ठ अधिक्षक श्री.मुकुंद बडवे तसेच सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्री.ईश्वर पाटील यांच्याशी वेळोवेळी चर्चा करुन सदरच्या दिल्ली आदेशामध्ये संदिग्धता असल्याचे कळवून देखील ही कारवाई थांबलेली नाही, असेही यावेळी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
यामध्ये महाराष्ट्र शासनाची नियतकालिके असलेल्या शेतकरी, किशोर, कृषी पणन मित्र, जीवन शिक्षण यांना देखील अशा नोटीसा आल्या आहेत, ज्यांचा खप सुमारे 3 लाखांच्या आसपास आहे. याबरोबरच साधना, वनराई, निरोप्या, क़ॉर्पोरेट सिटीझन, दिलीपराज वृत्त, हिंदूबोध, मधुमित्र, याज्ञवल्क्य परिवार, योेगेश्वर वार्ता, निर्मळ रानवारा, चाणक्य मंडल परिवार, सुगावा अशा अनेकांना नोटीसा आल्या आहेत. त्यामुळे या नियतकालिकांना सवलत नाकारल्याने व्यावसायिक दराने पोस्टींग करावे लागणार आह, जे आवाक्याबाहेरचे आहे. दिल्लीच्या टपाल खात्याने काढलेले आदेश त्वरीत रद्द केले जावेत अशी जोरदार मागणी नियतकालिकांच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे.