निर्यातदारांच्या सहाय्यासाठी आणि त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी 24 तास कार्यरत राहणारी हेल्पलाईन केंद्र सरकार सुरु करणार – पियुष गोयल.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रव्यापी वाणिज्य सप्ताहाचा पियुष गोयल यांनी सेझ नोएडा इथे केला प्रारंभ
निर्यातदारांच्या सहाय्यासाठी आणि त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी 24 तास कार्यरत राहणारी हेल्पलाईन केंद्र सरकार संस्थात्मक करणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रव्यापी वाणिज्य सप्ताहाचा सेझ नोएडा इथे प्रारंभ करताना ते बीजभाषण देत होते. ‘ब्रान्ड इंडिया’म्हणजे दर्जा, उत्पादकता, कौशल्य आणि नवोन्मेश यांचा प्रतिनिधी राहावा हा आपला उद्देश असल्याचे ते म्हणाले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून प्रगतीशील भारताची 75 वर्षे साजरी करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय देशभरात 7 दिवसांचा विशेष कार्यक्रम सुरु करत आहे. वाणिज्य सप्ताहात देशाची कीर्ती तसेच जन चळवळ आणि जन भागीदारीची भावना प्रतीत होणार असल्याचे ते म्हणाले.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आखलेला वाणिज्य सप्ताह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या 5 स्तंभावर आधारित आहे. स्वातंत्र्य लढा, कल्पना @75, कामगिरी @75, कृती @75, आणि निर्धार @75. या आठवड्यात आयोजित केलेले कार्यक्रम याप्रमाणे आहेत-
- आत्मनिर्भर भारत ठळकपणे दर्शवणाऱ्या आणि आर्थिक शक्ती म्हणून भारताचा उदय दर्शवणाऱ्या, संबंधित, सरकार आणि लोकसहभाग असणारे समावेशक कार्यक्रम
- ‘शेतातून परदेशात निर्यातीपर्यंत’ (> 10 लाख चहाची रोपे लावण्यातले सहभागी) यावर लक्ष केंद्रित करणारे सत्र
- सर्व 739 जिल्हे समाविष्ट करणारा वाणिज्य उत्सव
- प्रत्येक राज्य/केंद्र शासित प्रदेशात ईपीसी द्वारे 35 निर्यात प्रोत्साहन कार्यक्रम, प्रदर्शने
- ईशान्य भागात आभासी गुंतवणूकदार परिषद
- 250 विशेष आर्थिक क्षेत्राद्वारा स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण
- 5 राष्ट्रीय चर्चा सत्रे /प्रदर्शने/आणि राष्ट्रीय निबंध स्पर्धा इत्यादींचे आयोजन
कंपनी करात कपात,थेट परकीय गुंतवणूक धोरण उदार करणे, एक खिडकी मंजुरी यासारख्या उपाय योजनांतून विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांची शृंखला केंद्र सरकारने हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड-19 महामारी असूनही, पंतप्रधानांच्या निर्णायक आणि धाडसी नेतृत्वामुळे आपली अर्थव्यवस्था उभारी घेत असून निर्यातीत लक्षणीय वाढ होत असल्याचे ते म्हणाले.
थेट परकीय गुंतवणूक ओघ सर्वोच्च असून उद्योग क्षेत्र उच्च विकासाच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले.