PM inaugurates 11 new medical colleges and a new campus of CICT in Tamil Nadu.
पंतप्रधानांनी तामिळनाडूमध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सीआयसीटीच्या नवीन संकुलाचे उद्घाटन केले.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तामिळनाडू मध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ (CICT) च्या नवीन संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया, डॉ एल मुरुगन आणि डॉ भारती पवार, तमिळनाडूचे मुख्यमंत्री थिरू एम के स्टॅलिन उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, 11 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनामुळे समाजाचे आरोग्य आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक बळकट होत आहे.
डॉक्टरांची कमतरता ही अनेक वर्षांपासूनची समस्या होती आणि सध्याच्या सरकारने ही गंभीर त्रुटी दूर करण्यास प्राधान्य दिले याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. 2014 मध्ये देशात 387 वैद्यकीय महाविद्यालये होती . गेल्या सात वर्षांत ही संख्या 596 वैद्यकीय महाविद्यालये इतकी झाल्याचे त्यांनी सांगितले. ही वाढ 54% आहे. 2014 मध्ये भारतात वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या सुमारे 82 हजार जागा होत्या. गेल्या सात वर्षांत ही संख्या सुमारे 1 लाख 48 हजार जागांवर गेली आहे. ही वाढ सुमारे 80% आहे.
2014 मध्ये देशात फक्त सात एम्स होत्या. परंतु 2014 नंतर मान्यताप्राप्त एम्सची संख्या 22 वर पोहोचली आहे. त्याचवेळी वैद्यकीय शिक्षण क्षेत्र अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध सुधारणा हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तामिळनाडूमध्ये एकाच वेळी 11 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करून, अलीकडेच उत्तर प्रदेशात 9 वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्घाटनाचा स्वत:चाच विक्रम मोडला, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. रामनाथपुरम आणि विरुधुनगर या दोन महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांसह निलगिरीच्या डोंगराळ जिल्ह्यात महाविद्यालये स्थापन करून प्रादेशिक असमतोल दूर केला जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.