पंतप्रधानांनी विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्रकल्पांची केली पायाभरणी आणि राष्ट्रार्पण.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या प्रमुख ठिकाणी चौपदरीकरण कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले आणि काही प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
याप्रसंगी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. आज येथे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पायाभरणी करण्यात आली असून श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे बांधकाम पाच टप्प्यात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे बांधकाम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे या प्रदेशाशी अधिक चांगल्या प्रकारे दळणवळण प्रस्थापित होईल, असे सांगून त्यांनी या प्रकल्पांसाठी भक्त, संत आणि भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाबद्दल आदर व्यक्त केला. इतिहासातल्या उलथापालथीच्या काळातही भगवान विठ्ठलावरची श्रद्धा अढळ राहिली आणि “आजही ही यात्रा जगातील सर्वात जुन्या जनयात्रांपैकी एक आहे. वारीकडे एक लोकचळवळ म्हणून पाहिली जाते, जी आपल्याला शिकवते की मार्ग वेगवेगळे असू शकतात, पद्धती आणि कल्पना वेगवेगळ्या असू शकतात , पण आमचे ध्येय एकच आहे. सरतेशेवटी सर्व पंथ हे ‘भागवत पंथ’ आहेत, हे भारताच्या शाश्वत ज्ञानाचे प्रतीक आहे जे आपल्या श्रद्धेला बांधून ठेवत नाही, तर मुक्त करते,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
भगवान विठ्ठलाचा दरबार सर्वांसाठी खुला असून तिथे सर्वच समान आहेत ; हीच भावना ‘सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास’मागे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ही भावना आपल्याला देशाच्या विकासासाठी प्रेरित करते, सर्वांना बरोबर घेऊन जाते, सर्वांच्या विकासासाठी प्रेरणा देते, असे ते म्हणाले.
भारताच्या अध्यात्मिक समृद्धीचे प्रतिबिंब दर्शवताना पंतप्रधान म्हणाले की, पंढरपूरची सेवा हीच त्यांच्यासाठी श्री नारायण हरीची सेवा आहे. ही अशी भूमी आहे जिथे आजही भगवान भक्तांच्या कल्याणासाठी राहतात. ही ती भूमी आहे जिच्याबद्दल संत नामदेव महाराजांनी पंढरपूर हे जग निर्माण झाल्यापासून असल्याचे प्रतिपादन केले आहे.
वेळोवेळी वेगवेगळ्या प्रदेशात महान व्यक्तींचा उदय होत राहिला आणि त्यांनी देशाला दिशा दाखवली, हे भारताचे वैशिष्ठय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. दक्षिणेत मध्वाचार्य, निम्बार्काचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य आणि पश्चिमेला नरसी मेहता, मीराबाई, धीरो भगत, भोजा भगत, प्रीतम यांचा जन्म झाला. उत्तरेत रामानंद, कबीरदास, गोस्वामी तुलसीदास, सूरदास, गुरु नानक देव, संत रैदास होते. पूर्वेला चैतन्य महाप्रभू, शंकर देव यांच्यासारख्या संतांच्या विचारांनी देश समृद्ध झाला.
वारकरी चळवळीच्या सामाजिक महत्त्वावर भाष्य करताना पंतप्रधानांनी वारीतील महिलांचा पुरुषांप्रमाणेच उत्साहाने सहभाग हे या परंपरेचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे सांगितले. देशातील महिला शक्तीचे हे प्रतिबिंब आहे. ‘पंढरीची वारी’ समान संधीचे प्रतीक आहे. वारकरी चळवळीत भेदभावाला स्थान नाही आणि ‘भेदाभेद अमंगळ’ हे तिचे ब्रीदवाक्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी वारकरी बंधू-भगिनींकडे तीन आशीर्वाद मागितले. त्यांच्याबद्दल वाटणारी अतीव आपुलकी त्यांनी व्यक्त केली. त्यांनी भाविकांना पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याची विनंती केली. तसेच या पदपथावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची व या मार्गांवर अनेक कुंड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती केली. भविष्यात भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्रांपैकी पंढरपूर व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. हे कामही लोकसहभागातून होईल. जेव्हा स्थानिक लोक स्वच्छता चळवळीचे नेतृत्व आपल्या हाती घेतील, तेव्हाच आपण हे स्वप्न साकार करू शकू, असे पंतप्रधानांनी सांगितले.
बहुतांश वारकरी हे शेतकरी समाजातून आलेले आहेत, असे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की,भूमिपुत्रांनी भारतीय परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवली आहे. खरा ‘अन्नदाता’ समाजाला जोडतो आणि समाजासाठी जगतो. समाजाच्या प्रगतीचे मूळ तुम्ही आहात आणि तुमच्या प्रगतीतच समाजाची प्रगती आहे, असे सांगून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.
दिवेघाट ते मोहोळ असा सुमारे 221 किमीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि पाटस ते तोंडाळे-बोंडाळे असा सुमारे 130 किमीचा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, या मार्गांचे चौपदरीकरण करून त्यांच्या दोन्ही बाजूंना पालखीसाठी समर्पित पदपथ बांधले जातील, ज्याचा प्रस्तावित खर्च अनुक्रमे सुमारे 6690 कोटी रुपये आणि सुमारे 4400 कोटी रुपये इतका आहे.
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी विविध राष्ट्रीय महामार्गांवरील 223 किलोमीटरहून अधिक पूर्ण झालेले आणि सुधारित रस्ते प्रकल्पदेखील राष्ट्राला समर्पित केले. पंढरपूरचा विविध राष्ट्रीय महामार्गांशी संपर्क वाढवण्यासाठी बांधण्यात आलेल्या प्रकल्पांची अंदाजे किंमत 1180कोटी रु. पेक्षा अधिक आहे. या प्रकल्पांमध्ये म्हसवड – पिलीव – पंढरपूर (NH 548E), कुर्डुवाडी – पंढरपूर (NH 965C), पंढरपूर – सांगोला (NH 965C), NH 561A चा टेंभुर्णी-पंढरपूर विभाग आणि NH 561A चा पंढरपूर – मंगळवेढा – उमाडी विभाग या रस्त्यांचा समावेश आहे.