पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामचे केले उद्घाटन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन केले. काशी इथे कालभैरव मंदिर आणि काशी विश्वनाथ धाम इथे त्यांनी प्रार्थना केली. गंगा नदीवर त्यांनी स्नानही केले.
नगर कोतवाल, भगवान काल भैरव यांच्या चरणी नमन करून पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाला सुरवात केली. यांच्या आशीर्वादाशिवाय काहीही विशेष घडू शकत नाही असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी भगवानाकडे देशवासीयांसाठी आशीर्वादाची प्रार्थना केली.काशी नगरीत एखाद्याने प्रवेश करताच ती व्यक्ती सर्व बंधनातून मुक्त होते असे त्यांनी पुरणाचा दाखला देऊन सांगितले. आपण इथे प्रवेश करताच भगवान विश्वेश्वराचे आशीर्वाद, एक अलौकिक चैतन्य आपल्या अंतरात्म्याला जागृत करते. विश्वनाथ धामचे हे संपूर्ण नवे संकुल म्हणजे केवळ भव्य इमारत नव्हे तर आपल्या भारताच्या सनातन संस्कृतीचे ते प्रतिक आहे. आपल्या आध्यात्मिक आत्म्याचे ते प्रतिक आहे. भारताच्या प्राचीनतेचे, परंपरेचे, भारताच्या चैतन्याचे आणि गतिमानतेचे ते प्रतिक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. इथे आल्यानंतर केवळ श्रद्धा नव्हे तर प्राचीन वैभवाचीही प्रचीती आपल्याला जाणवेल. प्राचीन आणि नाविन्यता यांचा अनोखा संगम आपल्याला दिसेल. प्राचीनतेमधली प्रेरणा भविष्याला कशी दिशा देते याची प्रचीती आपल्याला विश्वनाथ धाम संकुलात येत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
याआधी केवळ 3000 चौरस फुट असलेला मंदिर परिसर आता पाच लाख चौरस फुटापर्यंत विस्तारला आहे. आता 50000 – 75000 भाविक मंदिर आणि मंदिर परिसराला भेट देऊ शकतात. प्रथम गंगा माता दर्शन मग गंगा नदीवर स्नान आणि तेथून थेट विश्वनाथ धाम असे त्यांनी सांगितले.
काशी नगरीचे महात्म्य वर्णन करताना काशी अविनाशी आणि भगवान शिवांच्या छायाछत्राखाली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या भव्य संकुलाचे बांधकाम करणाऱ्या प्रत्येक मजुराचे त्यांनी आभार मानले. कोरोना मुळेही त्यांनी कामात खंड पडू दिला नाही. त्यांनी मजुरांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. धाम बांधणीसाठी काम करणाऱ्या मजुरांसमवेत पंतप्रधानांनी भोजन घेतले. कारागीर, बांधकामाशी निगडीत लोक, प्रशासन आणि इथे राहणाऱ्या कुटुंबांचीही त्यांनी प्रशंसा केली. काशी विश्वनाथ धाम प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी अविरत परिश्रम घेणाऱ्या उत्तर प्रदेश सरकार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केले.
आजचा भारत आपला गमावलेला वारसा पुन्हा जिवंत करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. येथे काशीमध्ये माता अन्नपूर्णा स्वतः वास करते. काशीतून चोरीला गेलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती आता शतकाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा काशीत स्थापन झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
त्यांच्यासाठी देव माणसांच्या रूपात येतो आणि त्यांच्यासाठी प्रत्येक भारतीय देवाचा अंश आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी देशासाठी लोकांना तीन संकल्प घेण्यास सांगितले – स्वच्छता, निर्मिती आणि आत्मनिर्भर भारतासाठी निरंतर प्रयत्न.
पंतप्रधानांनी स्वच्छतेला जीवनाचा मार्ग म्हटले आणि या उपक्रमात, विशेषत: नमामि गंगे अभियानामध्ये लोकसहभागाचे आवाहन केले. गुलामगिरीच्या प्रदीर्घ काळाने आमचा आत्मविश्वास अशा प्रकारे तोडला की आमचा स्वतःच्या निर्मितीवरचा विश्वास उडाला असे पंतप्रधान म्हणाले. आज या हजार वर्षांची परंपरा असलेल्या काशीतून मी प्रत्येक देशवासीयाला आवाहन करतो, पूर्ण आत्मविश्वासाने निर्मिती करा, नाविन्यपूर्ण गोष्टी करा, नाविन्यपूर्ण मार्गाने करा.
पंतप्रधान म्हणाले की, स्वावलंबी भारतासाठी आपले प्रयत्न वाढवण्याचा तिसरा संकल्प आज घेण्याची गरज आहे. भारत स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करेल तेव्हा भारत कसा असेल, यासाठी आपल्याला या ‘अमृत काळा’मध्ये, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी काम करावे लागेल, असे पंतप्रधानांनी भाषणाच्या समारोप प्रसंगी सांगितले.