पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार.
श्री काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीच्या सर्व किनाऱ्यांशी जोडण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न या प्रकल्पामुळे प्रत्यक्षात साकार होणार.
40 पेक्षा अधिक प्राचीन मंदिरांचा शोध, पुनरुज्जीवन आणि सौंदर्यकरणाचे काम पूर्ण.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून म्हणजेच येत्या 13- 14 डिसेंबर रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. 13 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान श्री काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करतील आणि त्यानंतर ते काशी विश्वनाथ धाम च्या पहिल्या टप्प्यातील इमारतींचे उद्घाटन करतील. सुमारे 339 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
बाबा विश्वनाथाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा उभरल्या जाव्यात, अशी पंतप्रधान मोदी यांची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. इथे येणाऱ्या भाविकांना कायम, अव्यवस्था, गर्दीचे छोटे रस्ते, आणि गंगेत स्नान करण्याच्या जागांवर अस्वछता याचा त्रास सहन करावा लागतो. गंगाजल घेणे आणि मंदिरात ते अर्पण करण्याच्या प्रथेच्या पालनातही त्यांना त्रास होतो. त्यामुळे, त्यांना विविध सुविधा देण्यासाठी, श्री काशी विश्वनाथ धाम, या भव्य प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली. श्री काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीशी जोडणारे सगळे मार्ग सहजतेने जोडण्याचे काम या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले आहे. या पवित्र प्रयत्नाची सुरुवात करण्यासाठी 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या जागेवर भूमीपूजन करण्यात आले होते.
या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर पंतप्रधान स्वतः देखरेख ठेवून होते, या प्रकल्पाविषयी, नियमितपणे माहिती, आढावा घेणे आणि देखरेखीचे काम त्यांनी वेळोवेळी केले. तसेच, कामाचा दर्जा वाढवण्यासाठी, प्रकल्पातील सुविधा सर्व भाविकांसाठी-अगदी दिव्यांगांसाठीही अधिकाधिक सहज साध्य होण्यासाठीच्या सूचना आणि सल्लेही त्यांनी वेळोवेळी दिले. या प्रकल्पाची संरचना अशा तऱ्हेची करण्यात आली आहे, जेणेकरुन, वृद्ध लोक आणि दिव्यांगांना इथे जाणे सुलभ होईल. त्यात रेंप, एस्केलेटर्स आणि इतर आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, 23 इमारतींचे उद्घाटन केले जाणार आहे. या अंतर्गत, श्री काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यात, यात्री सुविधा केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, वैदीक केंद्र, मुमुक्षू भवन, भोगशाला, शहर वस्तूसंग्रहालय, पर्यटक गॅलरी, फूड कोर्ट अशा सुविधांचा समावेश आहे.
हा प्रकल्प विकसित करताना सर्व वारसा वास्तूंचे जतन केले जावे, हे देखील पंतप्रधानांचे ध्येय होते. जुन्या मालमत्ता नष्ट करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, 40 हून अधिक प्राचीन मंदिरे पुन्हा सापडली तेव्हा ही दूरदृष्टी उपयुक्त ठरली. या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यात आले असून, मूळ रचनेत कोणताही बदल होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
वाराणसी दौऱ्या दरम्यान, पंतप्रधान 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कालभैरव मंदिराला भेट देतील आणि 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता रो-रो जहाजातून गंगा आरतीचे साक्षीदार होतील.