पंतप्रधान 5 नोव्हेंबरला केदारनाथला भेट देऊन श्री आदि शंकराचार्य समाधीस्थळाचे उद्घाटन करणार.
पंतप्रधान करणार श्री आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधील केदारनाथला भेट देणार आहेत. ते केदारनाथ मंदिरात प्रार्थना करतील तसेच श्री आदि शंकराचार्य समाधीस्थळाचे उद्घाटन करतील आणि श्री आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. 2013 च्या महापुरात झालेल्या विध्वंसानंतर समाधीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.
पंतप्रधान एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. त्याशिवाय, ते सरस्वती रिटेनिंग वॉल आस्थापथ आणि घाट, मंदाकिनी रिटेनिंग वॉल आस्थापथ, तीर्थ पुरोहित घरे आणि मंदाकिनी नदीवरील गरुड चाटी पूल यासह पूर्ण झालेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करतील. 130 कोटींहून अधिक खर्चाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
संगम घाटाचा पुनर्विकास, प्रथमोपचार आणि पर्यटक सुविधा केंद्र, प्रशासन कार्यालय आणि रुग्णालय, दोन अतिथीगृहे, पोलीस स्टेशन, कमांड अँड कंट्रोल सेंटर, मंदाकिनी आस्थापथ रांग व्यवस्थापन आणि निवारा आणि सरस्वती नागरी सुविधा इमारत यासह 180 कोटींहून अधिक किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. सरस्वती आस्थापथावर सुरू असलेल्या कामांचाही पंतप्रधान आढावा घेतील आणि पाहणी करतील.
2013 मध्ये केदारनाथमधील नैसर्गिक आपत्तीनंतर, 2014 मध्ये त्याच्या पुनर्बांधणीला सुरुवात करण्यात आली. केदारनाथ येथील संपूर्ण पुनर्बांधणीचे काम पंतप्रधानांच्या वैयक्तिक मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले आहे, त्यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीचा सातत्यपूर्ण आढावा घेऊन निरीक्षण केले आहे आणि तिथे पुनर्विकासाचे काम सुरू करण्यासाठी त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे.
यानिमित्ताने चार धाम सह (बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि रामेश्वरम) देशभरातील ज्योतिर्लिंग आणि ज्योतिषपीठावर कार्यक्रम आयोजित केले जातील. या कार्यक्रमात प्रथेनुसार सकाळची आरती आणि त्यानंतर वैदिक मंत्रोच्चाराचा समावेश असेल. सांस्कृतिक मंत्रालय ज्योतिर्लिंग/ज्योतिषपीठाच्या परिसरात किंवा जवळपासच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करेल. कार्यक्रमांमध्ये स्थानिक भाषा किंवा संस्कृतमधील कीर्तन/भजन/शिव स्तुती आणि त्यानंतर शिव तांडव किंवा अर्धनरेश्वर रूपावर आधारित शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा समावेश असेल. वीणा, व्हायोलिन, बासरीसह शास्त्रीय वादनाचा कार्यक्रमही यावेळी होणार आहे.
आदि शंकराचार्यांचे जन्मस्थान असलेल्या केरळमधील कलाडी येथील शंकराचार्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे मंत्री श्री जी. किशन रेड्डी प्रमुखपदी असतील. मंदिर परिसरात होणाऱ्या कार्यक्रमात इतर कार्यक्रमांबरोबरच कलाडीच्या श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे आदि शंकराचार्यांच्या रचनेचे पारायण आणि श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठाच्या नृत्य विभागातर्फे आदि शंकराचार्यांच्या रचनेवर आधारित शास्त्रीय नृत्य (भरतनाट्यम आणि मोहिनीअट्टम) सादरीकरण होणार आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजनेअंतर्गत ‘केदारनाथचा एकात्मिक विकास’ अंतर्गत अनेक कामे पूर्ण केली आहेत. एकात्मिक प्रकल्पांतर्गत, रुद्रप्रयाग येथील इकॉनॉमिक हायजिनिक फूड शॉप, स्वच्छतागृहे, इको-लॉग इंटरप्रिटेशन सेंटर, इन्फॉर्मेटिव्ह साइनेज, स्नानघाट असे अनेक प्रकल्प घटक; तिलवाडा येथे वाहनतळ, आसन व्यवस्था, सौर एलईडी पथ दिवे, स्वच्छतागृहे, दिशात्मक संकेत; ऑगस्टमुनी येथे आसन व्यवस्था, 3 विश्रांती निवारे, 2 व्ह्यू पॉइंट, संरक्षण भिंती, स्वच्छतागृहे, वाहनतळ; उखीमठ येथे पर्यावरणपूरक लाकडी झोपड्या, इंटरप्रिटेशन सेंटर, प्रसाद दुकाने, बहुस्तरीय वाहनतळ; गुप्तकाशी येथे सौर एलईडी पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन; कालीमठ येथे फूड कियोस्क, रिटेनिंग वॉल; सीतापूर येथे आसन व्यवस्था, पर्यटन माहिती केंद्र, सौर एलईडी पथदिव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही, देखरेख ठेवणे, वाय-फाय इन्स्टॉलेशनसह सात ठिकाणी IEC (आयातक -निर्यातकर्ता कोड) देखील पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्पाचे सर्व मंजूर हस्तक्षेप जून 2021 मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. केदारनाथ प्रकल्पाच्या एकात्मिक विकासासाठी 34.78 कोटी रुपये प्रकल्प खर्च मंजूर करण्यात आला आहे.
प्रकल्पाच्या संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.
केदारनाथ हे भाविकांमध्ये एक आकर्षक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून पुढे येत आहे. ध्यान गुहा, ज्यामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 17 तास एकांतात व्यतीत केले, ती भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे. शासनाने ही प्राचीन गुहा पुनर्निर्माण प्रकल्पांतर्गत भैरवनाथ मंदिरासमोर ध्यानधारणेसाठी तयार केली आहे. पंतप्रधानांच्या ध्यान सत्रानंतर ही गुहा भारतीय आणि आंतरराष्ट्रीय यात्रेकरूंमध्ये लोकप्रिय झाली.
केदारनाथ धाम येथे स्थानिक प्रशासनाकडून आणखी तीन गुहा विकसित केल्या जात आहेत. या तीन गुहा केदारनाथजवळ सुमारे 12,500 फूट उंचीवर बांधल्या जात आहेत जेणेकरून भाविक एकांतात आणि शांततेत ध्यान करू शकतील.