पर्यटन संचालनालयाकडून ट्रॅव्हल गाईड बनन्याची संधी, 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.
पुणे : पर्यटनवृद्धीला चालना तसेच स्थानिक युवकांना रोजगार अशा दुहेरी हेतूने राज्यातील 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्यावतीने राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचा या 14 पर्यटन स्थळांमध्ये समावेश आहे. या प्रशिक्षणासाठी भाग घेऊ इच्छिणाऱ्या युवक- युवतींनी 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या गावचे किल्ले, डोंगर, दऱ्या, मंदिरे, एखादे ऐतिहासिक संग्रहालय किंवा सामाजिक, सांस्कृतिक, नैसर्गिक वरदान लाभलेल्या कोणत्याही स्थळाची माहिती संकलित करण्याच्या आवडीला करिअर मध्ये रूपांतरित करण्याची चांगली संधी महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (डीओटी) घेऊन आले आहे. स्थानिक प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी टूर गाईडची व्यवस्था करून या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दुहेरी हेतूने राज्यातील तब्बल 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये जुन्नर (पुणे) ठिकाणाचा समावेश असणार आहे.
सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट, ग्वाल्हेर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ज्ञ प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतील. ज्यात मुख्यतः स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा उपाययोजना पाळून पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा तसेच पर्यटकांशी संवाद साधताना आपल्याकडील माहिती गोष्टीरूपाने कशी मांडावी याविषयी सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी स्थानिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी हे तज्ञ प्रात्यक्षिक मार्गदर्शन करतील. पाच दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल.
या प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्ष वा त्यापेक्षा अधिक असावे. शिक्षण 40 वर्षापेक्षा कमी वय असल्यास किमान 12 वी उत्तीर्ण आणि 40 वर्षापेक्षा अधिक वय असल्यास किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी https://www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/certified-guide-training या संकेतस्थळावर 31 डिसेंबर 2021 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाने केले आहे.