पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भारती विद्यापीठाला भेट

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भारती विद्यापीठाला भेट.

आरोग्य क्षेत्रातील संशोधनात सातत्य हवे : आदित्य ठाकरे.

पुणे : कोरोना काळात आरोग्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण नवीन संशोधनाची गरज आपल्या लक्षात आली असून त्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. Environment Minister Aditya Thackeray visits Bharati University

भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागातील 3 टी एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीनचे उद्घाटन मंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहकार राज्यमंत्री तथा भारती विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.विश्वजित कदम, खासदार प्रफुल्ल पटेल, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट माजी आमदार श्रीमंत छत्रपती मालोजीराजे, भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.

माजी मंत्री स्व.पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना करुन शिक्षण क्षेत्रात खूप मोठे काम केले असे सांगून श्री.ठाकरे म्हणाले, त्यांनी दूरदृष्टीने उभ्या केलेल्या विद्यापीठाच्या रुग्णालयाने या काळात हजारो कोविड बधितांना बरे केले आहे. विद्यापीठाने डॉ.पतंगराव कदम यांच्या स्मृतिनिमित्त उभारलेले वास्तुसंग्रहालय हे राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना पहायला खुले करावे, जेणेकरुन त्यांनी केलेल्या संघर्षाचा आणि कार्याचा आदर्श पुढील पिढीला घेता येईल असे त्यांनी सांगितले.

पुढील वर्षी 17 वर्षाखालील महिलांची जागतिक फूटबॉल स्पर्धा मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशीही माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. डॉक्टर, परिचारिका तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड योद्धा म्हणून बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, भारती विद्यापीठ हे सामाजिक बांधिलकी जपणारे विद्यापीठ आहे. सर्वसामान्यांना शिक्षण मिळेल या ध्येयाने त्यांनी छोट्या शिक्षणसंस्थेपासून सुरुवात करुन अनेक विद्याशाखा असलेल्या अभिमत विद्यापीठात रुपांतर केले. संशोधनाचे मोठे काम या विद्यापीठात केले जाते. कोरोना काळात 12 हजारावर रुग्ण भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले आहेत. तसेच विद्यापीठाने इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हायर्नमेंट रिसर्च (बीव्हीआयईईआर) या संस्थेची स्थापना करुन पुढील काळात पर्यावरण शिक्षणाला नवी ओळख देण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले.

खासदार श्री.पटेल म्हणाले, शिक्षण हे देशाला घडवण्याचे एक मोठे माध्यम आहे. डॉ. पतंगराव कदम यांनी जनतेला आव्हानांवर मात करण्याचे शिक्षण दिले. देशातील जगात सर्वाधिक असलेली युवकांची संख्या योग्य शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभी राहील तेव्हाच ते देशाची शक्ती बनू शकतील. कोरोनाने आपल्याला आरोग्य क्षेत्रात संशोधनाची, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची गरज लक्षात आणून दिली आहे. केवळ आजचाच नव्हे तर भविष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेले विद्यापीठाचे कार्य कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी डॉ. शिवाजीराव कदम आणि डॉ. अस्मिता जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी मान्यवरांनी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हायर्नमेंट रिसर्च या संस्थेला भेट देऊन पाहणी केली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *