Chief Minister’s appeal that it is necessary for everyone to be aware to protect the environment
पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी सजग होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई : हवा पाणी आणि मातीचं प्रदुषण या बरोबरच पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे अनेक जैव प्रजाती नष्ट होतांना आपण पाहात असतांना सगळ्यांनीच पर्यावरण रक्षणासाठी सजग होणं आवश्यक असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज माझी वसुंधरा ३ या कार्यक्रमा अंतर्गत पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. आपलं सरकार पर्यावरण रक्षणाला कटिबद्ध असल्याचं सांगतानाचं त्यांनी या अभियानांतर्गत पारितोषिक प्राप्त स्थानिक स्वराज्य संस्था, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचं अभिनंदन केलं. राज्याला गर्द झाडी, अथांग सागरासह निसर्गाचं वरदान लाभल असल्याचंही ते म्हणाले.
नौदलाच्या पश्चिम कमांडतर्फे मुंबई आणि इतर किनाऱ्यांवर खारफुटी लागवडीला प्रोत्साहन देण्यात आलं. वेस्टर्न कमांड परिवारातर्फे चित्रकला स्पर्धा आणि पर्यावरण जागृती अभियानही राबवले जात असल्याचं नौदलानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड मधल्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, मराठवाडा कृषी विद्यापीठात विशेष प्रचार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. झपाट्यानं होणाऱ्या वातावरणातल्या बदलामुळे कृषी उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. या परिणामावर उपयोजना करण्यासाठी, कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेऊन संशोधन करावं, असं आवाहन वसंतराव ऩाईक मराठवाडा कृषी विद्यापाठीतील कृषी विभागाचे संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी यावेळी केलं.
औरंगाबाद इथं महानगरपालिका उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीनं, सिडको इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन आणि स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पुढे येऊन औरंगाबाद शहर प्रदुषण मुक्त राहण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचं आवाहन, सहकार मंत्री अतुल सावे यांनी यावेळी केलं.
सोलापूरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या परिसरात पर्यावरण दिनानिमित्त १०१ वृक्षांचे रोपण करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यात सायकल रॅली त्याचप्रमाणे १०१ नारळाची झाडं लावण्यात आली. जळगावमधे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय जन भागीदारी जी २० शैक्षणिक समुह उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळमध्ये क्लिन एमआयडीसी, ग्रीन एमआयडीसी या संकल्पनेतंर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छ केलेल्या जागेवर यंदा ५०० कोकम, सुरुंगी, फणस, जांभूळ अशा उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड केली जाणार असून ही झाडं उद्योजक, सामाजिक संस्था तसंच सेवाभावी वृक्ष प्रेमींनी दत्तक घेतली आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com