पात्र ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रेसाठी डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचा केंद्र सरकारचा निर्वाळा.
दिल्ली : कोविड प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा घेताना लाभार्थ्याला मधुमेह किंवा इतर आजार असल्यास त्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र लसीकरण केंद्रावर सादर करावं लागेल अशा प्रकारचे कोणतेही निर्देश केंद्रसरकारने जारी केलेले नाहीत असं केंद्रीय आरोग्य सचिवांनी स्पष्ट केलं आहे.
या संदर्भात प्रमाणपत्र आवश्यक असल्याची वृत्तं विविध माध्यमातून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा खुलासा केला आहे वर्धक मात्रेसाठी पात्र लाभार्थ्यांना कोविन मंचावरुन आठवण करुन देणारा संदेश मिळेल आणि त्याचा उल्लेख लसीकरण प्रमाणपत्रावर असेल. या मात्रेकरता येत्या १ जानेवारीपासून कोविनवर नोंदणी करता येईल. तसंच थेट लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊनही लस घेता येईल.
रोगप्रवण गटाकरता तिसरी वर्धक मात्रा येत्या १० जानेवारीपासून उपलब्ध होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार १५ ते १८ वर्ष वयोगटासाठीचं लसीकरण येत्या ३ जानेवारीपासून सुरु होईल.
लसीकरण मोहिमेबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर समन्वय साधण्याच्या हेतूने केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी एक कार्यशाळा घेतली. लशीची दुसरी मात्रा घेऊन झाल्यानंतर किमान ९ महिन्यांनी वर्धक मात्रा घेता येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.