पिनाका एक्स्टेंडेड रेंज सिस्टीम, एरिया डिनायल म्युनिशन्स आणि नवीन स्वदेशी फ्यूजच्या यशस्वी चाचण्या.
पिनाका एक्स्टेंडेड रेंज (पिनाका-ईआर), एरिया डिनायल म्युनिशन (एडीएम) आणि स्वदेशी बनावटीच्या फ्यूजच्या यशस्वी चाचण्या करण्यात आल्या आहेत. पिनाका-ईआर मल्टी बॅरल अग्निबाण प्रक्षेपण प्रणालीची पोखरण रेंजवर यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) – आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ARDE-आयुध संशोधन आणि विकास प्रतिष्ठान ), पुणे आणि उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा (HEMRL), पुणे यांनी संयुक्तपणे ही प्रणाली विकसित केली आहे.
डीआरडीओने, लष्करासह, गेल्या तीन दिवसांत अग्निबाणांची कामगिरी मूल्यमापन चाचणी घेतली. या चाचण्यांमध्ये, अद्ययावत श्रेणीतील पिनाका अग्निबाणांची विविध क्षमतांसह चाचणी घेण्यात आली. चाचणीची सर्व उद्दिष्टे समाधानकारकपणे पूर्ण झाली. अचूकता आणि सुसंगततेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी 24 अग्निबाण डागण्यात आले.
पिनाका-ईआर ही पूर्वीच्या पिनाकाची अद्ययावत आवृत्ती आहे, जी गेल्या दशकापासून भारतीय लष्कराच्या सेवेत आहे.
एआरडीई, पुणे द्वारे पिनाकासाठी आरेखित केलेले आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाअंतर्गत उद्योग भागीदारांनी उत्पादित केलेल्या एरिया डिनायल म्युनिशनचीही (ADM) यशस्वी चाचण्या झाल्या. या चाचण्या तंत्रज्ञान समावेशनाअंतर्गत कामगिरी मूल्यांकनाचा भाग आहेत.
पिनाका अग्निबाणासाठी स्वदेशी-विकसित प्रेरण फ्यूजचीही चाचणी घेण्यात आली आहे. एआरडीई, पुणे यांनी पिनाका अग्निबाणासाठी विविध प्रकारच्या उपयोजनांसाठी वेगवेगळे फ्यूज विकसित केले आहेत.
देशात प्रथमच विकसित स्वदेशी संशोधन आणि विकास प्रयत्नांद्वारे हे विकसित केले गेले आहेत. हे स्वदेशी विकसित फ्यूज आयात फ्यूजची जागा घेतील आणि परकीय चलनाची बचत करतील. वरील सर्व चाचण्यांमध्ये सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या पार पडली.