Decision to start school after next week’s review.
पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय.
खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यासाठी जलतरण तलाव सुरू करा-उपमुख्यमंत्री अजित पवार.
पुणे : जिल्ह्यातील वाढता संसर्गाचा दर लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर निर्णय घेण्यात येईल. खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यासाठी जलतरण तलाव सुरू करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत श्री.पवार यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. श्री.पवार म्हणाले, लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या खेळाडूंसाठी खेळाची मैदाने सुरू करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. भीमाशंकर देवस्थानाच्या ठिकाणी नागरिकांना दर्शनाची अनुमती द्यावी. लेण्याद्री देवस्थानाबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची मुभा द्यावी.
वर्धक मात्रेसाठी सुविधा देण्याचे निर्देश
ज्येष्ठ नागरिकांना लशीची वर्धक मात्रा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. शनिवार आणि रविवार ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे. महापालिका क्षेत्रात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा. औद्योगिक अस्थापनांनी कामगारांना लशीच्या दोन मात्रा देण्याविषयी सूचना देण्यात याव्या.
रुग्णांना उपचार सुविधा देण्याच्या सूचना
शहरी भागात वाढता संसर्ग लक्षात घेता अधिकांशी नागरीक घरीच उचार घेत असले तरी कोविड केअर सेंटरमधील यंत्रणा सज्ज ठेवावी. कोविड रुग्णांना उपचारासाठी त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. खाजगी रुग्णालयानाही कोविड रुग्णांना दाखल करून उपचार सुविधा देण्याच्या सूचना द्याव्यात. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध खाटांच्या योग्य नियोजनाकडे लक्ष द्यावे, असे श्री.पवार यांनी सांगितले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा घेण्याविषयी माहिती देण्यात यावी. मास्क लावण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात यावे.
बैठकीत श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात मागील आठवड्याच्या तुलनेत ३२ हजार ९२२ ने रुग्णासंख्येत वाढ झाली आहे. १५ ते १८ वयोगटातील ५१ टक्के मुलांचे पाहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पुणे मनपा अंतर्गत रक्षक नगर क्रीडा संकुल येथे २७५ खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात पहिल्या मात्रेचे १०८ टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे ७७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाई करून ३४ लक्ष ५५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली.
रुग्णवाहिकचे लोकार्पण
बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन यांनी उरूळी कांचन गावासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. श्री.कांचन दरवर्षी वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी उपक्रम राबवितात. त्यांचे जनसेवेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे श्री.पवार यावेळी म्हणाले.
श्री प्रयागधाम ट्रस्टतर्फे ३०० कांबळी भेट
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत उरूळी कांचन येथील श्री प्रयागधाम ट्रस्टतर्फे शहरातील गरीब नागरिकांसाठी ३०० कांबळी भेट देण्यात आल्या. संस्थेने नेहमीच लोकोपयोगी कामासाठी सहकार्य केले आहे. थंडीच्या दिवसात या कांबळी गरीबांसाठी उपयुक्त ठरतील असे यावेळी श्री.पवार म्हणाले.