पुणे चक्राकार महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती

peed up land acquisition process for Pune Ring Road पुणे चक्राकार रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Expediting land acquisition process for Pune Ring Road

पुणे चक्राकार महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती

संमतीकरारनाम्याद्वारे जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना भूमिसंपादनाचा मोबदला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान

peed up land acquisition process for Pune Ring Road पुणे चक्राकार रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

पुणे : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला प्रस्तावित पुणे चक्राकार महामार्ग प्रकल्पाला जिल्हा प्रशासनाच्या गतीमान कार्यवाहीमुळे वेग आला असून आज या प्रकल्पासाठी संमतीकरारनाम्याद्वारे जमीन दिलेल्या १४ शेतकऱ्यांना भूमिसंपादनाच्या मोबदल्याचे सुमारे १३ कोटी ८२ लाख ९० हजार रुपये इतक्या रकमेचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) अधीक्षक अभियंता राहूल वसईकर, अपर जिल्हाधिकारी हणुमंत अरगुंडे, भूसंपादन (समन्वय) उपजिल्हाधिकारी प्रविण साळुंखे, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता अजित पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, आजचा दिवस पुणे जिल्ह्यासाठी, राज्यासाठी महत्त्वाचा आहे. एक प्रकारे खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आज सुरूवात झाली आहे. हा प्रकल्प राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुण्यामध्ये वाहतूक कोंडीचा सर्वांनाच त्रास होतो. त्यावर मात करण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. कोविड काळातही या प्रकल्पासाठी सर्वेक्षण, जमीन मोजणी आदी प्रक्रियेत राज्य रस्ते विकास महामंडळ, महसूल विभाग, भूमि अभिलेख व मूल्यनिर्धारण विभाग यांनी अतिशय सक्षमपणे काम केले आहे.

या प्रकल्पासाठी मोबदल्याची रक्कमही पारदर्शक व वाजवी निश्चित करण्यात आलेली आहे. ही सर्व प्रक्रिया सर्व खातेदारांना विश्वासात घेत अत्यंत पारदर्शकतेने राबविल्याने जमीन देणाऱ्यांना प्रचलित दरापेक्षा कमी मोबदला मिळणार नाही याकडे विशेष लक्ष दिले आहे. शिवाय संमती करारनाम्याद्वारे प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना एकूण मोबदल्याच्या २५ टक्के अतिरिक्त वाढीव मोबदला दिला जात आहे. शासनाने सुमारे १ हजार कोटी रुपये भूसंपादनासाठी दिले असून त्यामुळै संमती करारनामे करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देणे शक्य होत आहे. जसजशी अधिक शेतकऱ्यांची संमती मिळेल तसे शासनाकडून अधिकचा निधी उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.

पैशाचे योग्य नियोजन करा

भूसंपादनातून मिळालेल्या पैशाचे योग्य नियोजन करण्याचा सल्लाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिला. मोठ्या प्रमाणात मिळालेल्या रकमेचा भविष्यासाठी चांगल्याप्रकारे उपयोग करा, शाश्वत गुंतवणूक करा, अनावश्यक बाबींवर खर्च करु नका, असेही ते म्हणाले. रकमेच्या गुंतवणुकीसाठी चांगल्या पर्यायांची माहिती खातेदारांना होण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुणे (पश्चिम) रिंगरोडसाठी हवेली तालुक्यातील कल्याण गावातील एकाच कुटुंबातील ९ शेतकरी, मावळ तालुक्यातील ऊर्से गावातील दोन शेतकरी, पाचाणे गावातील शेतजमिनीचा मोबदल्याचा धनादेश, मुळशी तालुक्यातील घोटावडे गावातील दोन शेतकरी असे एकूण सुमारे ३ हेक्टर १७ आर संपादित क्षेत्रासाठी १३ कोटी ८२ लाख ९० हजार रुपयांचे धनादेश शेतकऱ्यांना देण्यात आले.

शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त

या प्रकल्पाला जमीन दिल्याबद्दल मिळालेल्या मोबदल्यावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करुन प्रकल्पाचा भविष्यातही पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

रामचंद्र रघुनाथ चव्हाण, मौजे कल्याण (ता. हवेली): अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले. अडचणी सोडविण्यासाठी तलाठी ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत सर्वांनीच सहकार्य केले. शासन ज्या ज्या योजना करत आहे त्या लोकांसाठीच करत आहे. त्यामध्ये सहभाग देता आला याचा आनंद आहे. दिलेल्या मोबदल्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. त्याचा योग्य उपयोग, पुनर्गुंतवणूक चांगल्याप्रकारे करण्यासाठी प्रयत्न करू.

मिलिंद अण्णासाहेब शेलार, मौजे ऊर्से (ता. मावळ): रिंग रोडच्या संदर्भात अतिशय चांगला, आम्ही अपेक्षाही केली नव्हती इतका मोबदला मिळाला आहे. आम्ही स्वत:हून सहमती दिल्यामुळे २५ टक्के अधिक मोबदला मिळाला आहे. आम्ही या पैशाचे चांगले नियोजन करणार आहोत. सर्वांनीच संमती देऊन अधिकचा मोबदला मिळवावा.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने २३ जुलै रोजी वाहतूकीत बदल
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *