Distribution of Punyashlok Ahilya Devi Holkar Awards
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण
जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी निधी देण्यात येईल-पालकमंत्री
पुणे : पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार करावा, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
हॉटेल लेमन ट्री येथे महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विभागस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त आर.विमला, उपायुक्त राहुल मोरे, उपायुक्त दिलीप हिवराळे, विभागीय उपायुक्त संजय माने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, स्वयंसेवी संस्था आपले वैयक्तिक योगदान देऊन शासनाच्या योजना राबिवतात. हे काम स्वतःच्या समाधानासाठी, आत्म्याची भूक भागविण्यासाठी स्वयंस्फूर्तीने करण्यात येते. इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी हे कार्य केले जाते. या कार्यात विविधता वाढवावी आणि समाजाच्या गरजा लक्षात ठेवून उपक्रम राबवावे. समाजातील उणिवेवर मात करण्यासाठी आणि महिलांच्या समस्या सोडविण्याबाबत अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
महिला व बालविकासाच्या क्षेत्रात विविध व्यक्ती आणि संस्थांना येणाऱ्या अडचणी त्यांनी कळविल्यास त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येईल. समाजात महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
महिलांना एसटी बसच्या तिकिटात ५० टक्क्यांची सवलत देण्यात आली आहे. ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, सहावीत ६ हजार रुपये आणि अकरावीत ८ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्रीमती आर.विमला म्हणाल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार अनेकांसाठी प्रेरक आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून समाजकार्याचा आदर्श समोर ठेवला आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत पुरस्कार विजेत्यांनी आपल्याही कार्याने इतरांसमोर आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले.
शासनाने महिलांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. महिलांच्या प्रगतीसाठी शासनासोबत समाजाच्या प्रत्येक घटकांचे सहकार्य आवश्यक आहे. महिला बालविकास विभाग परितक्त्या महिला व निराधार बालकांसाठी काम करत आहे, असेही त्या म्हणाल्या.
पालकमंत्री श्री.पाटील यांच्या विविध संस्था आणि व्यक्तींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विभागस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com