पुण्यातील ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला सुरुवात.

Deputy Chief Minister Ajit Pawar

पुण्यातील ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला सुरुवात.

प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी, संबंधित यंत्रणांच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दर आठवड्याला आढावा.

पीपीपी’ तत्त्वावरचा देशातला पहिलाच प्रकल्प; तीन वर्षात होणार काम पूर्ण.Deputy Chief Minister Ajit Pawar

मुंबई :- पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचा असणारा माण-हिंजवडी ते शिवाजीनगरच्या मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. सार्वजनिक-खासगी सहभाग असलेला (पीपीपी) हा देशातला पहिलाच मेट्रो प्रकल्प असून येत्या तीन वर्षात या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लावण्यासाठी, तसेच या संबंधिच्या विविध प्रकारच्या मान्यतांसह तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या प्रकल्पाच्या संबंधित सर्व यंत्रणांचा प्रत्येक आठवड्याला मंत्रालयात विशेष आढावा घेतात. त्यामुळेच हे काम वेगाने मार्गी लागले.

‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’च्या मार्गिका तीनचे काम सुरु करण्यासाठी विविध प्रकारच्या मान्यता आणि तांत्रिक अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात प्रत्येक आठवड्याला या बाबतची विशेष आढावा बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यात आला. त्यामुळे या मेट्रोच्या मार्गिकेसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे संपादन ‘भू-संपादन व पुनर्वसन कायदा २०१३’चा अवलंब करण्यात आला आहे. मेट्रो कार डेपो, राईट ऑफ वे आणि स्टेशनसाठी लागणारी सुमारे ९८ टक्के जमीन प्राधिकरणाने संपादित केली आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व परवानग्या व लायसन्स प्राप्त करून घेण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याआधीच इतके भू-संपादन व विहित सर्व परवानग्या प्राप्त करणारा हा देशातला पहिला प्रकल्प आहे.

या मेट्रो मार्गिकेची लांबी २३.२ किलोमीटर असून या मार्गिकेत २३ स्टेशन्स प्रस्तावित आहेत. केंद्र सरकारच्या ‘मेट्रो रेल धोरण २०१७’ अन्वये सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत असलेला हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्याबरोबरचं राज्य सरकारचे २० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य लाभणार आहे. पुणे शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचे दीर्घकालीन निराकरण करण्यासाठी प्रस्तावित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करण्यात आले असून, त्याला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टा) व पुणे महानगरपालिका यांची मान्यता घेण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन अभिकरण मे. ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स पुढे आल्या आहेत. त्यांनी ‘पुणे आय टी सिटी मेट्रो रेल लि.’ ही विशेष उद्देश संस्था स्थापन केली आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु करणेसाठी ट्राफिक डायव्हर्जन प्लॅन तयार करण्यात आला असून, या याबाबत दि. २६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या पुम्टाच्या बैठकीत याबाबतची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. हा प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *