PM inaugurates 25th National Youth Festival in Puducherry.
पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पंतप्रधानांकडून उद्घाटन.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती असून हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून पाळला जातो. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी “माझ्या स्वप्नांमधील भारत ” आणि “भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे दुर्लक्षित नायक ” या विषयावरील निवडक निबंध प्रसिद्ध केले. दोन संकल्पनांवर 1 लाखाहून अधिक तरुणांनी सादर केलेल्या निबंधांमधून हे निबंध निवडण्यात आले आहेत.
देशाचा युवा वर्ग हा विकासाचा चालक असून देशाच्या सुख आणि सुरक्षेचे मार्ग युवकच तयार करतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनिमित्त पुद्दुचेरी इथं आयोजित राष्ट्रीय युवक महोत्सवाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते.
भारतातल्या युवकांकडे लोकशाही मूल्ये आहेत त्यामुळे जग भारताकडे आशेनं, विश्वासानं बघत आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज एम.एस.एम.ई तंत्रज्ञान केंद्राचं लोकार्पणही केलं. आत्मनिर्भर भारतासाठी एम.एस.एम.ई ची भूमिका महत्वाची आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
भारत स्टार्टअपच्या सुवर्णकाळात प्रवेश करत आहे. सध्या ५० हजारापेक्षा जास्त स्टार्टअपची इको सिस्टीम भारताकडे आहे, असं त्यांनी सांगितलं. मुलगी आणि मुलगा समान असतात अशी सरकारची भावना आहे ह्या विचारातनच मुलींच्या लग्नाचं वय वाढवून २१ वर्ष करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
मुलीही त्यांचं करियर करू शकतात त्यासाठी त्यांना अधिक वेळ मिळाला पाहिजे, यादृष्टीनं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे असं प्रधानमंत्री म्हणाले.
आजच्या राष्ट्रीय युवा दिनाच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी युवकांना संबोधित केल्याबद्दल, अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. ठाकूर म्हणाले की स्वामी विवेकानंद हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहेत, ज्यांची जयंती 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा संदेश आणि दृष्टिकोन मांडणाऱ्या आणि जगामध्ये देशाची प्रतिमा मजबूत करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे, असे ते म्हणाले.
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, आपल्या पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपला देश पुढे जात असतानाच, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली देशाला नवी दिशा देण्यासाठी युवकही पूर्णपणे सज्ज झाले आहेत.
ठाकूर म्हणाले की, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो तरुणांनी दिलेले बलिदान आपण विसरता कामा नये. तसेच आपण आपल्या स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षात पोहोचेपर्यंत देश नवीन शिखरे गाठेल हे सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आता कठोर परिश्रम केले पाहिजेत.