पेरणे फाटा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नियोजनाचा आढावा.
पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास १ जानेवारी २०२२ रोजी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.
बैठकीस पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, पेरणे येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येत असतो. गतवर्षी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मर्यादीत होती. यावर्षी अधीक संख्येने नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता संबधित यंत्रणांनी तातडीने आवश्यक नियोजन करावे. विभागातील सबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत करावयाच्या कामाबाबत पाहणी करून कामे वेळेत होतील, याची दक्षता घ्यावी.
वाहतुकव्यवस्था, प्रकाशव्यवस्था, रस्ते दुरूस्ती, विद्युतव्यवस्था आदी आवश्यक कामे तातडीने पुर्ण करावीत असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिले. तसेच कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत विविध संघटनासोबतच लवकरच बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.शिसवे आणि पोलीस अधीक्षक श्री.देशमुख यांनीदेखील नियोजनाबाबत सूचना दिल्या. बैठकीला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.