प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित.
दिल्ली : किसान सन्मान निधी अंतर्गत देशभरातल्या शेतकऱ्यांना आजवर १ लाख ८० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी दिला आहे. यातून त्यांना शेतीसाठी गुणवत्तापूर्ण बीयाणं आणि खतं विकत घेणं शक्य झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी आज प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत अर्थसहाय्याचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून जमा केला. त्यावेळी ते दूरदृश्य प्रणालीच्या ते बोलत होते.
या हप्त्यासाठी २० हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली. १० कोटी पेक्षा जास्त शेतकरी परिवार याचे लाभार्थी आहेत. प्रधानमंत्र्यांनी आज ३५१ ई-पी-एफ-ओ इक्विटी अनुदान जारी केलं. याचा लाभ १ लाख २४ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांना होईल. यावेळी प्रधानमंत्र्यांनी विविध राज्यांमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्यासह राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.
एफपीओ मुळे शेतकरी एकट्यानं नाही तर एकत्रित काम करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना शेतीविषयक साधनं स्वस्तात उपलब्ध होणं, बाजाराची उपलब्धता, संभाव्य नुकसान कमी करणं असे अनेक फायदे होणार असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. देशाचा अन्नदाता उर्जादाता व्हावा हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यासाठी सरकार शेतकऱ्यांना सौर उर्जा निर्मितीसाठी मदत करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
गेल्या ७ वर्षात सरकारनं नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानकारक रसायनांपासून सुटका मिळाल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोरोनाविरुद्धचा लढा आणि लसीकरण मोहीमेतलं यश तसंच विविध क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारनं राबलेल्या योजना आणि उपक्रमांची तसंच त्यातून शेतकऱ्यांचं हित कसं साधलं जात आहे याविषयीची माहिती दिली. कोरोनाचं संकट कायम असलं तरी त्यामुळे भारताची वाटचाल थांबणार नाही, त्याउलट भारत कोरोनाचा सक्षमतेनं सामना करत पुढे वाटचाल करत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.