Prime Minister Narendra Modi launched the 5G service in New Delhi
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीदिल्लीत ५ जी सेवेचा प्रारंभ
5-जी ही देशाच्या प्रवेशद्वारी झालेली नव्या युगाची नांदी आहे.
5-जी अमर्याद संधीच्या आकाशाची सुरुवात आहे
भारताने, दूरसंचार तंत्रज्ञानात पहिल्यांदाच जागतिक मापदंडाशी बरोबरी साधली आहे
5जी तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांना मिळणारे फायदे
नवी दिल्ली : 5-जी सेवेच्या शुभारंभासह भारताचा नव्या युगात प्रवेश होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीच्या प्रगती मैदानात 5- जी इंटरनेट सेवेचा प्रारंभ करताना बोलत होते. आजच्या तारखेची इतिहासात नोंद होणार असून आपण प्रत्येक नागरिकाला शुभेच्छा देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 5-जी तंत्रज्ञानामुळे देशाच्या गावागावात क्रांती होणार असून शैक्षणिक क्रांतीही होणार आहे असं त्यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कक्षा रुंदावणार असल्याचं ते म्हणाले ग्रामीण भागात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असून एक लाख 75 हजाराहुन अधिक ग्रामपंचायतींपर्यंत ऑप्टिकल फायबर पोचल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. 5- जी सेवेसाठी पहिल्या टप्प्यात तेरा शहरांचा समावेश असून मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देशात 5- जी सेवा पोहोचणार असल्याचं ते म्हणाले. मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगून मोबाईल उत्पादनात भारत कोणत्याही देशावर अवलंबून नसल्याचं ते म्हणाले.
देशात मोठ्या प्रमाणावर डेटा क्रांती होत असून 5-जी मुळे तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. 5-जी सेवेमुळे इंटरनेटचा वेग दहापट अधिक वाढणार असून फोनवरचा संवाद विनाअडथळा होईल तसंच संपूर्ण चित्रपट केवळ दहा सेकंदात डाउनलोड करता येईल असं ते म्हणाले. १३० कोटी भारतीयांना 5-जी च्या माध्यमातून बक्षीस देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी
देशाला, 2047 पर्यंत ‘विकसित देश’ बनवण्याची उमेद जागवणाऱ्या पंतप्रधानांच्या प्रेरणादायी द्रष्टेपणाबद्दल रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. “सरकारचे प्रत्येक धोरण आणि कृती लक्षपूर्वक आणि भारताला समृद्ध बनवण्यासाठी केली जाते, निश्चित उद्दिष्ट ठेवून केली जाते. भारताला, 5-जी युगात जलद गतीने नेण्यासाठी, जी पावले टाकण्यात आली, ती पंतप्रधानांच्या दृढनिश्चयाचाच पुरावा आहे.” असे ते यावेळी म्हणाले. शिक्षण, हवामान बदल अशा सगळ्या क्षेत्रात, 5-जी मुळे काय काय संधी उपलब्ध होऊ शकतील, याविषयी त्यांनी माहिती दिली.
भारती एन्टरप्रायजझेसचे अध्यक्ष, सुनील भारती मित्तल
भारती एन्टरप्रायजझेसचे अध्यक्ष, सुनील भारती मित्तल म्हणाले, की देशांत 5-जी सेवा सुरु होणे, ही नव्या युगाची सुरुवात आहे. आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असतांना येणारी ही आधुनिक सेवा अधिकच विशेष आहे. “पंतप्रधानांच्या प्रयत्नांतून येणाऱ्या या सेवेमुळे, देशात नव्या ऊर्जेचा प्रवेश झाला आहे. ज्यांना तंत्रजज्ञानाची अतिशय बारकाईने समज आहे, आणि त्याचा देशाच्या विकासासाठी कसा वापर करायचा याचा ज्यांनी प्रत्यक्ष प्रत्ययच घालून दिला आहे, असे नेतृत्व आपल्याला पंतप्रधानांच्या रूपाने लाभले, हे आपले भाग्यच आहे.” असे ते पुढे म्हणाले. 5-जी तंत्रज्ञान, देशातल्या लोकांसाठी अमर्याद संधीचा सागर घेऊन येणार आहे, विशेषतः ग्रामीण भागात, यामुळे विपुल संधी उपलब्ध होतील, असे मित्तल म्हणाले.
आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला
आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की, देशात 5-जी तंत्रज्ञानाचे आगमन होणे ही जागतिक मंचावर भारताची ताकद दर्शवणारी घटना आहे. तसेच, भारताच्या प्रगतीत दूरसंचार विभागाची भूमिका भक्कम आधाराची आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. तंत्रज्ञानात एका जनरेशनची उडी घेण्याच्या भारताच्या प्रगतीमागे असलेली पंतप्रधान मोदी यांची दूरदृष्टी आणि नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले. त्यांच्या नेतृत्वामुळेच आज जागतिक मंचावर भारताने आपली छाप सोडली असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान 5-जी सेवेमुळे सर्वच क्षेत्रांसह शैक्षणिक क्षेत्रातही मोठी क्रांती घडून येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज पनवेल इथं महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थांशी संवाद साधताना बोलत होते. 5-जी सेवेमुळे शिक्षणाचा दर्जा उंचावेल असं ते म्हणाले.
5जी तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांना मिळणारे फायदे
5जी तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्य माणसाला अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत. यामुळे विनाअडथळा नेटवर्क कव्हरेज, हाय डेटा रेट, लो लेटन्सी आणि उच्च दर्जाची भरवशाची दूरसंचार सुविधा मिळणार आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊर्जा कार्यक्षमता, स्पेक्ट्रम कार्यक्षमता आणि नेटवर्क कार्यक्षमतेतदेखील वाढ होणार आहे. अब्जावधी इंटरनेट ऑफ थिंग्ज उपकरणे कनेक्ट करण्यामध्ये या तंत्रज्ञानाची मदत होईल, प्रवास करत असतानाही उच्च दर्जाच्या व्हिडिओ सेवा उपलब्ध होतील, त्याचबरोबर टेलिसर्जरी आणि चालकरहित तंत्रज्ञानावर चालणाऱ्या गाड्या यांसारख्या अतिशय महत्त्वाच्या सेवा उपलब्ध होणे शक्य होणार आहे. आपत्तींवर रियल टाईम मॉनिटरिंग, कृषीमध्ये अचूकता आणि खोल खाणींमधल्या खाणकामासारख्या अतिधोकादायक कामांमध्ये मानवाचा प्रत्यक्ष वापर कमी करता येईल.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com