प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात २४ लाख लाभार्थ्यांची नोंद.

Pradhan Mantri Matruvandana Yojana

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात २४ लाख लाभार्थ्यांची नोंद.

सुमारे एक हजार कोटीपेक्षा अधिक निधीचे लाभार्थ्यांना वितरण.Pradhan Mantri Matruvandana Yojana

माता व बालमृत्यूदर कमी करण्याबरोबरच माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुमारे २३ लाख ९२ हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून सुमारे १ हजार कोटीपेक्षा जास्त निधीचे वितरण करण्यात आले आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने कळविले आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात सुमारे २३ लाख ९२ हजार ५५२ लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून सन २०२१-२२ या वर्षातील नोंदणी उद्दिष्टाचे हे प्रमाण ९२ टक्के आहे. सर्वाधिक १०१ टक्के लाभार्थ्यांची नोंदणी पुणे जिल्ह्यात झालेली असून तिथे २ लाख ८ हजार १६६ लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. राज्यातील सर्व नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांसाठी सुमारे १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वितरित करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत शासनाने अधिसूचना केलेल्या संस्थेत अथवा शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस पहिल्या जीवित अपत्यापर्यंत लाभ दिला जात असून ५ हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येते. वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. पात्र गर्भवती महिलेस ३ टप्प्यात डीबीटीद्वारे संबंधित गर्भवती लाभार्थी महिलेच्या थेट संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यामध्ये लाभाची रक्कम थेट जमा केली जाते.

मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर एक हजार रुपये दिले जातात. किमान एकदा प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास गर्भ धारणेच्या ६ महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा दोन हजार रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो तर प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डिपीटी आणि हिपॅटॅटीस व तसेच पेन्टाव्हॅलेन्ट च्या ३ मात्रा अथवा समतुल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यात जमा केला जातो.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबद्दल…

देशात दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारिरीक क्षमता नसतानाही मजूरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. परिणामी देशाच्या मातामृत्यू व बालमृत्यूच्या दरात वाढ होते. माता व बालमृत्यू दरावर नियंत्रण ठेवून हा दर कमी करण्यासाठी आणि माता व बालकाचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने १ जानेवारी २०१७ पासून केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात सुरु केली आहे. या योजनेंतर्गत माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आजपासून विशेष सप्ताह

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने आज, दि.१ सप्टेंबरपासून ७ सप्टेंबर २०२१ दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहादरम्यान सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्ती/एएनएम/अंगणवाडी कार्यकर्ती यांचेकडे आवश्यक कागदपत्रे देवून या योजनेचा लाभ घ्यावा ,असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *